तासगावात आजी-माजी खासदार भिडले
सांगली : खरा पंचनामा
तासगाव नगरपालिकेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमात सोमवारी सांगलीचे आजी-माजी खासदार एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात माजी खासदार संजयकाका पाटील हे बोलत असताना त्यांच्याकडून उल्लेख झाल्यावर सध्याचे खासदार विशाल पाटील हे स्टेजवरच उठून उभे राहिले आणि माझे नाव काढायचे काही कारण होते का, असा प्रश्न विचारायला लागले.
हा प्रकार सुरू झाल्यावर काही कार्यकर्ते स्टेजवर आले आणि त्यांनी विशाल पाटील यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी संजयकाकाही स्टेजवरून कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना देत होते. सांगलीचे पालकमंत्री सुरेख खाडे आणि आमदार सुमनताई पाटील यांच्यासमोरच या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
भर कार्यक्रमात सगळ्यांच्या समक्ष आजी-माजी खासदार भिडल्याने काहीवेळ स्टेजवरील अन्य व्यक्ती गोंधळून गेल्या होत्या. संजयकाका पाटील बोलत असतानाच त्यांच्याकडून झालेल्या उल्लेखामुळे विशाल पाटील नाराज झाले आणि त्यांनी तिथेच उभं राहून त्यांच्या बोलण्याला आक्षेप घेतला. माझे नाव काढायचे काही कारण होते का, असा प्रश्न विशाल पाटील यांनी उपस्थित केला. त्याला संजयकाका पाटील यांच्याकडून काही उत्तर दिले गेले नाही.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगलीतील मतदारांनी विशाल पाटील यांना बहुमताने निवडून देत संजयकाका पाटील यांचा पराभव केला होता. विशाल पाटील या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरले होते. तरीही मतदारांनीच ही निवडणूक हातात घेत विशाल पाटील यांना विजयी केले होते. तेव्हापासूनच संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्यातील अंतर आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी नगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या उदघाटनासाठी हे दोघेही एकत्र येणार असल्याचे समजल्यावरच राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर भरसभेत दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले. काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून विशाल पाटील स्टेजवर त्यांच्या आसनावर बसले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.