Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुटख्याची अवैध वाहतूक करणारा टेम्पो, कार जप्त, दोघांना अटक ५०.५० लाखांचा मुद्देमाल पकडला, सांगली एलसीबीची नागजमध्ये कारवाई

गुटख्याची अवैध वाहतूक करणारा टेम्पो, कार जप्त, दोघांना अटक
५०.५० लाखांचा मुद्देमाल पकडला, सांगली एलसीबीची नागजमध्ये कारवाई



सांगली खरा पंचनामा

कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे एक्सप्रेस वेवरून गुटखा, सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारा टेम्पो आणि एक कार जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ५०.५० लाखांचा मुद्देमाल पकडण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. 

रायाप्पा कप्पन्ना पुजारी (वय ३५, रा. उमराणी, ता. चिकोडी), सुनिल ज्ञानोबा शिंदे (वय ४२, रा. नांदणी, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी अवैध व्यवसाय, गुटखा, दारू तस्करीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते. पथक कवठेमहांकाळ तालुक्यात गस्त घालत होते. 

त्यावेळी पथकाला मिरज-सोलापूर एक्सप्रेस वेवरून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो (केए २२ डी ७४२५) नागज येथे आल्यानंतर तो पथकाने अडवला. टेम्पोची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा, सुगंधित सुपारी सापडली. त्याबाबत चालक रायाप्पा पुजारी याच्याकडे चौकशी केल्यानंतर एका कारमधून (एमएच ०४ एफए ०१०२) त्याचा साथीदारही जात असल्याचे सांगितले. पथकाने पाठलाग करून ती कार थांबवून सुनिल शिंदे यालाही ताब्यात घेतले. दोन्ही वाहने तसेच गुटखा, सुगंधित तंबाखू जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. जप्त मुद्देमालासह दोघांना कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, गुंडू दोरकर, अमर नरळे, आमसिद्धा खोत, सागर लवटे, संदीप गुरव, संदीप नलावडे, विक्रम खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.