हॉटेलसमोरून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, २३ दुचाकी जप्त
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील २१ गुन्हे उघड, मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर येथील हॉटेलसमोर उभ्या केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन्ही जिल्ह्यातील २१ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या २३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली.
अमोल संभाजी साबळे (वय ४९, रा. चिंचणी, ता. तासगाव), राहुल नामदेव बागल (वय २४, रा. बेडग, ता. मिरज, मूळ रा. माळी गल्ली, तासगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी दुचाकी चोरीतील संशयितांना पकडण्याच्या सूचना महात्मा गांधी चौक पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांचे एक पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी पथकातील विक्रम खोत यांना मिरजेतील समतानगर येथील रेल्वे फाटकाजवळ सापळा रचून दुचाकी चोरणाऱ्या अमोल साबळे याला गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतले.
साबळे याच्याकडे असलेल्या मोपेडबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने ती तासगाव येथून चोरल्याची कबुली दिली. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १८ दुचाकी जप्त करण्यात आल्या. तर साबळेने दिलेल्या माहितीनुसार राहुल बागल याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यानेही दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांच्याकडून महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडील ११, विश्रामबाग पोलिस ठाण्याकडील ३, संजयनगर पोलिस ठाण्याकडील १, जयसिंगपूर पोलिस ठाण्याकडील १, इलकरंजी पोलिस ठाण्याकडील २, शाहुपुरी पोलिस ठाण्याकडील ३ असे २१ गुन्हे उघडकीस आणण्यात आले.
मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाने महात्मा गांधी चौकचे सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, विक्रम खोत, अभिजित धनगर, सूरज पाटील, विनोद चव्हाण, जावेद शेख, अभिजित पाटील, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.