Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लाच लुचपत विभागाच्या बड्या अधिकाऱ्याकडून मुलाच्या हत्येचा प्रयत्न

लाच लुचपत विभागाच्या बड्या अधिकाऱ्याकडून मुलाच्या हत्येचा प्रयत्न



नाशिक : खरा पंचनामा

शहरातील पाथर्डी फाटा परिसरात फ्लॅटमध्ये मुलाचा गळा आवळून भिंतीवर डोके आपटून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे अप्पर पोलिस अधीक्षक अनिल पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकच्या पाथर्डी फाटा येथे हरी विश्व सोसायटी गृह प्रकल्पातील ए विंगमध्ये १३०२ क्रमांकाचा फ्लॅटची पवार व त्यांच्या पत्नीत कौटुंबिक वाद असल्याने दोन भागामध्ये विभागणी करण्यात आली आहे. एका भागात पवार व दुसऱ्या भागात त्यांची पत्नी व दोन मुले राहतात. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता पवार यांनी अभिषेक व त्याची आई, भाऊ असे राहत असलेल्या फ्लॅटच्या बाहेर मोठमोठ्याने आरडाओरडा करून शिवीगाळ करत दरवाजावर लाथा मारून दहशत निर्माण केली. त्यावेळी अभिषेक यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस येऊन वडील पवार यांना समजावून सांगून निघून गेले.

त्यानंतर परत साडेदहा वाजता पवार यांनी अभिषेक राहत असलेल्या फ्लॅटच्या दरवाजासमोर मोठ मोठ्याने त्याच्या आईला व त्याला शिवीगाळ करत दरवाजावर लाथा मारून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यास अभिषेकने विरोध केला असता पवार यांनी त्याला धरून तुला मारून टाकतो, असे म्हणत घराबाहेर काढून त्याचा गळा आवळून भिंतीवर डोके आपटले. अभिषेकच्या डोक्यातून रक्तस्राव झाला. त्यामुळे चक्कर येऊन अभिषेक खाली पडला. त्याला त्याच्या भाऊ आणि आईने खाजगी रुग्णालयात दाखल केले. अभिषेक अनिल पवार याच्या फिर्यादीवरून अनिल पवार यांच्याविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक अनिल पवार यांच्या घरी दीड महिन्यापूर्वी घरफोडी झाली होती. त्यात चार लाखाचा मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद पवार यांनी केली होती. कुटुंबात वाद असल्याने या घटनेच्याही अनेक शक्यता पोलिसांनी तपासल्या होत्या. सिसिटीव्ही कॅमेरे फोडून चोरांनी सोबत डिव्हीआर नेला होता. या चोरी प्रकरणाचे गौडबंगाल अद्याप कायम आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.