Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पैशांची बॅग लंपास करणाऱ्याला अटक ५.२५ लाखांची रोकड जप्त, आंध्रप्रदेशमध्ये सांगली एलसीबीची कारवाई

पैशांची बॅग लंपास करणाऱ्याला अटक
५.२५ लाखांची रोकड जप्त, आंध्रप्रदेशमध्ये सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

कवठेमहांकाळ येथे पैसे पडल्याचे कारण सांगत एकाने मोपेडला लावलेली दहा लाखांची रोकड असलेली बॅग लंपास करणाऱ्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ५.२५ लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत. आंध्रप्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यात ही कारवाई केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. 

सलमान शंकराय्या चल्ला (वय ५२, रा. कपरालथिप्पा, बिटरगुंट्टा, जि. नेल्लोर, आंध्रप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. २६ जून रोजी आरेवाडी येथील शामराव कोळेकर यांनी कवठेमहांकाळ येथील एका बॅंकेतून दहा लाखांची रोकड काढली. रोकड असलेली पिशवी त्यांनी मोपेडच्या हूकला लावली होती. त्यावेळी एका व्यक्तीने तुमचे पैसे पडले आहेत असे त्यांना सांगितले. कोळेकर पडलेले पैसे गोळा करत असताना अज्ञाताने त्यांची दहा लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली होती. याबाबत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

यातील संशयिताला पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते. चोरट्याचा शोध घेत असताना पथकातील हवालदार सागर लवटे यांना ही चोरी आंध्रप्रदेशमधील चल्ला याने केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने आंध्रप्रदेशमधील नेल्लोर गाठले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने बिटरगुंट्टा येथे जाऊन सापळा रचून चल्ला याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडील चोरीची ५.२५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. त्याला कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, सागर लवटे, संदीप नलावडे, अमर नरळे, अनिल कोळेकर, उदय माळी, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.