स्टीलचा हातगाडा चोरणाऱ्या मिरजेच्या दोघांना अटक
सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरातील चहा विक्रीचा स्टीलचा गाडा चोरणाऱ्या मिरजेतील दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून हातगाडा, एक दुचाकी असा सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
श्रावण सुरेश बनसोडे (वय २८, रा. दिंडी वेस, मिरज), प्रज्वल प्रकाश पांढरे (वय २३, रा. ब्राह्मणपुरी, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संतोष भगत यांचा चहा विक्रीचा हातगाडा कॉलेज कॉर्नर परिसरात आहे. मंगळवारी सकाळी अज्ञातानी तो चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. निरीक्षक मोरे यांनी चोरट्यांना शोधण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या.
पथक चोरट्यांचा शोध घेत असताना बायपास रस्त्यावरील एका हॉस्पिटलजवळ दोघेजण स्टीलचा गाडा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने त्या परिसरात सापळा रचून बनसोडे आणि पांढरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून स्टीलचा गाडा आणि दुचाकी जप्त करण्यात आली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्या दोघांनी त्यांचा साथीदार आकाश पवार याच्या मदतीने गाडा चोरल्याची कबुली दिली. दोघांना अटक करण्यात आली. तर पवार पसार झाला आहे.
शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार, मच्छिंद्र बर्डे, संदीप पाटील, गौतम कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले, प्रशांत पुजारी, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.