पोलीस ठाण्यासाठी वापरला फुकटचा एसी, एलईडी
हायकोर्टाने महासंचालकांना दिले चौकशीचे आदेश
मुंबई : खरा पंचनामा
ठाणे येथील कासारवडवली पोलिसांनी एसी, एलईडी, वॉटर कुलर, प्रिंटर व अन्य काही वस्तू पोलीस ठाण्यासाठी घेतल्या व वापरल्याही, पण त्याचे पैसेच दिले नाहीत. या वस्तू पोलिसांना देणाऱ्याने याची ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रारही केली आहे. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
एवढय़ा महागड्या वस्तू पोलिसांनी कोणत्याही नियमांचे पालन न करता घेतल्याच कशा? या आरोपात तथ्यता असेल तर ते गंभीर आहे. याची तक्रार करण्यात आली आहे. त्याची चौकशी व्हायलाच हवी. पोलीस महासंचालक यांनी या चौकशीसाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी. या अधिकाऱ्याने तीन महिन्यांत ही चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असे आदेश न्या. सारंग कोतवाल व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने दिले. यावरील पुढील सुनावणी फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे.
नैनेश पांचाळविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवण्यात आली होती. तक्रारदाराकडून त्याने 4.24 लाखांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतल्या व त्याचे पैसेच दिले नाहीत, असा आरोप होता. नंतर पांचाळने पावणेचार लाख रुपये तक्रारदाराला दिले व हा वाद मिटला. वाद मिटल्याने हा गुन्हा रद्द करण्यासाठी पांचाळने याचिका केली. यास तक्रारदाराने संमती दिली. त्यानुसार खंडपीठाने पांचाळविरोधातील गुन्हा रद्द केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.