एकनाथ शिंदेंची मोठी रणनीती, OSD मंगेश चिवटे पुन्हा मनोज जरांगेंच्या भेटीला
शिवसेनेच्या उमेदवारांना पाठींबा मिळवण्याच्या हालचाली
जालना : खरा पंचनामा
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना अंतरवाली सराटीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मनोज जरांगे यांनी 'अभय' द्यावे, यासाठी हालचाली सुरु असल्याचे समजत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी अंतरवाली सराटीत नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. सरसकट मराठा आरक्षणाची मागणी बारगळल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मंगेश चिवटे यांच्यावरही आगपाखड केली होती. मात्र, तेच मंगेश चिवटे हे बुधवारी पहाटे पुन्हा मनोज जरांगे यांच्या भेटीला गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
आंतरवाली सराटीत मनोज जरांगे आणि मंगेश चिवटे यांच्यात काही काळ चर्चा झाली. गेल्या 10 दिवसांतील मनोज जरांगे आणि मंगेश चिवटे यांची ही दुसरी भेट आहे. या भेटीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांची मनधरणी करत असल्याची चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी शिवसेनेचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात मराठा उमेदवार उभे करू नये, अशी विनंती एकनाथ शिंदे यांच्याकडून जरांगे यांना करण्यात आल्याचे समजते. यावर आता मनोज जरांगे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांची विनंती मान्य केल्यास विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो. एकनाथ शिंदे यांच्याबाबत मनोज जरांगे यांचे धोरण आजवर नरमाईचे राहिले आहे. त्यामुळे ते आता एकनाथ शिंदे यांची त्यांच्या पक्षाविरोधात उमेदवार न देण्याची विनंती मान्य करणार का, हे पाहावे लागेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.