Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"भाजपने बाहेरुन निवडणुकीसाठी 90 हजार लोक आणलेत, इथला ऑक्सिजन कमी झाला"

"भाजपने बाहेरुन निवडणुकीसाठी 90 हजार लोक आणलेत, इथला ऑक्सिजन कमी झाला"



पाथर्डी : खरा पंचनामा

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सध्या प्रचार सभांचा धुरळा उडताना दिसतोय. प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला असून, उद्या 18 नोव्हेंबर ही प्रचारासाठी अखेरचा दिवस असणार आहे.

कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता सर्व पक्ष मोठ्या ताकदीने मैदानात उतरले आहेत. पंकजा मुंडे यादेखील भाजप उमेदवारांसाठी सध्या मोठ्या सभा घेत असून, त्यांच्या सभांचा धडाका महाराष्ट्रभर सुरू आहे. अशातच त्या पाथर्डीमध्ये भाषण करत असताना, त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे. नुकताच त्यांनी 'बटेंगे तो कटेंगे' या नाऱ्याला विरोध केला होता.

राज्यातील निवडणुकांसाठी भाजपने आपली मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अपयशानंतर महायुतीतले सर्वच पक्ष अलर्ट झाले आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या योजना आणण्यात आल्या असून, त्यामधून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा पूर्ण प्रयत्न सध्या महायुतीचे नेते करत आहेत. तर दुसरीकडे भाजपने या निवडणुकीसाठी आपली एक स्वतंत्र यंत्रणा उभारल्याचं दिसतंय. राज्यातल्या प्रत्येक बूथवर लक्ष ठेवण्यासाठी 90 हजार लोक बाहेर राज्यातून इथे आल्याचं कळतंय. यावरच पंकजा मुंडे बोलत होत्या.

राज्यात 90 हजार बूथ आहे, त्यामुळे या निवडणुकीसाठी भाजपने देशातून 90 हजार लोक महाराष्ट्रात आणले, त्यामुळे बाहेरून इतके लोक आल्यानं महाराष्ट्रात ऑक्सिजन कमी झाला असा टोलाही पंकजा मुंडे यांनी लगावला. राज्यात काय चाललंय हे सगळं रिपोर्ट करतायत, इथे पंकजा मुंडेची सभा पाहिजे, इथे चांगला प्रतिसाद आहे अशी माहिती वर पाठवत असल्याचं त्यांनी सांगितलं.

"सगळ्या देशभरातून लोक आलेत, मला वाटतं राज्यात 90 हजार बूथ आहे, त्या 90 हजार बूथवर देशातून 90 हजार लोक आलेत. बघितलं भाजपचं काम काय साधं नाही. हे आलेत ना आमचे बंधू गुजरातमधून... या कासवालजींसारखे 90 हजार लोक आलेत महाराष्ट्रात, त्यामुळे इथला ऑक्सिजन कमी झाला"

पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहिर सभेस त्या संबोधित करत होत्या. त्यावेळी त्यांनी केलेल्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा होते आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.