नवीन मुख्यमंत्री शुक्रवारी घेणार शपथ!
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, भाजप नवीन मराठा चेहऱ्याला देणार संधी?
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. महायुतीने तब्बल २३७ जागांवर विजय मिळवला. निकालानंतर आता राज्याला नव्या मुख्यमंत्र्यांचे वेध लागले आहेत. देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार की एकनाथ शिंदेना पुन्हा संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र शिंदेनी मंगळवारी राजीनामा दिला असून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे भाजपने मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला आहे. आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा असतानाच त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष करावे असे हायकमांडने सुचवले आहे. शिवाय महाराष्ट्रात नवीन मराठा चेहऱ्याला संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री कोण होणार तसेच मंत्रीमंळात कोणाला संधी मिळणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. निकाल लागून तीन दिवस झाले तसेच स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्री पदाचे नाव अजूनही निश्चित झालेले नाही. त्यामुळे राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. भाजपमधीन बऱ्याच आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. शिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदासाठी पाठींबा असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाची चांगलीच अडचण झाल्याचे दिसून येत आहे.
मंगळवारी माळवते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. दरम्यान शिंदे यांनी आज राजीनामा देण्यापूर्वी काल मध्यरात्री एक्स प्लेटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. त्यावरून शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय शिंदे यांना केंद्रीय मंत्री मंडळात मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्या प्रस्तावावर शिंदे फारसे अनुकूल नसल्याची चर्चा आहे.
विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्विकारण्याचा आग्रह धरला आहे. मात्र फडणवीस यांना सध्यातरी केंद्रात जायचे नसून राज्यातच मुख्यमंत्री म्हणून काम करायचे असल्याची चर्चा आहे. याबाबतचा निर्णय झाला नसल्याने मुख्यमंत्री पदाच्या नावाच पेच अजूनही कायम आहे. शिवाय भविष्यातील राजकारण लक्षात घेऊन भाजपचे केंद्रीय नेतृत्व मराठा समाजातील नवीन चेहऱ्याला मुख्यमंत्री पद देण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. या पेचामुळेच निकाल लागूनही अद्याप नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला नसल्याचे बोलले जात आहे. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होऊन शुक्रवारी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडेल असे सूत्रांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.