Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'

'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'



कोल्हापुर : खरा पंचनामा

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातून प्रचाराला सुरुवात केली आहे. सकाळी उद्धव ठाकरे यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. दरम्यान, राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून के.पी. पाटील निवडणूक लढवत आहेत. आज त्यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राधानगरी येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापुरातून विधानसभेचे रणशिंग फुंकले. यावेळी सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेच्यावेळी मी भाषणाची सुरुवात देशप्रेमी बांधवांनो आणि भगिनींनो अशी करत होतो. दसरा मेळाव्यात मी हिंदू बांधवांनो अशी करतो, पण, आताची ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशी आहे, अशी टीका ठाकरे यांनी महायुतीवर केली.

"कोल्हापुरातून प्रचाराची सुरुवात करत आहे. हा राधानगरी मतदारसंघत गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडून मागच्यावेळी चूक झाली होती. सगळ काही देऊनसुद्धा यांनी गद्दारी केली, सगळ देऊनही शिवसेना या नावाच्या आईवरती वार करणारा माणूस तुमचा होऊ शकतो का?, असा सवाल करत ठाकरे यांनी प्रकाश आबिटकर यांच्यावर निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभेत माजी मंत्री सतेज पाटील यांना जवळ बोलावून आपल्यासोबत सतेज पाटील आहेत असं म्हणाले. ठाकरे म्हणाले, या मतदारसंघाच्या विजयाची जबाबदारी आता सतेज पाटील यांच्यावरच टाकत आहे.

"आपल्याला अजूनही न्यायालयाकडून न्याय मिळालेला नाही. डोळ्यावरची फक्त पट्टी काढली आहे. मी महाराष्ट्रासाठी लढत आहे. माझ्या रक्तात गद्दारी नाही, मी माझ्या महाराष्ट्राला गुलाम करणार नाही', असंही ठाकरे म्हणाले.

"निवडणुका जवळ आल्या की हिंदू-मुस्लिम करायचे. हिंदूंमध्ये भेदभाव करायचा, मराठी माणसांमध्ये भेदभाव करायचा. तोडायचे फोडायचे तरीही मला सत्ता मिळाली पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.

"मला के.पी. पाटलांनी इथलं पाणी अदानींना विकल्याचं सांगितल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला. मला वाटत होतम फक्त मुंबई अदानींना विकलं की काय, आता पाणी, चंद्रपुरातील शाळा अदानींना विकली जाते. महाराष्ट्रातील सगळं अदानींना विकलं जातंय मग आम्ही काय फक्त बघत बसायचं, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.

"महाराजांचा पुतळा उभा केला, त्या पुतळ्यातील पैसे खाणारी लोक महाराष्ट्र पुढं घेऊन जातील असं वाटत आहे का? महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारी यांचा साधा भाजपावाल्यांनी अपमानही केला नाही, तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने आम्ही महाविकास आघाडीचे सरकार आणणारच.

महाविकास आघाडीचे सरकार आणल्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचे मंदीर उभारणार अशी मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. मी सुरतमध्येही महाराजांचं मंदीर बांधून दाखवेन, असंही ठाकरे म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.