Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा, १.०९ कोटींचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा दणका अवैध व्यवसाय सुरू असल्यास प्रभारींना हटवण्याचे महानिरीक्षकांचे संकेत

सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा, १.०९ कोटींचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा दणका
अवैध व्यवसाय सुरू असल्यास प्रभारींना हटवण्याचे महानिरीक्षकांचे संकेत 



सातारा : खरा पंचनामा


सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीत असणाऱ्या महामार्गाशेजारील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी परिक्षेत्रातील हा दुसरा दणका दिला आहे. गुरुवारी मध्यरात्री हा छापा टाकण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत कारवाई सुरू होती. या छाप्यात रोकड, जुगार साहित्य, विदेशी दारू, मोबाईल, ६ आलिशान कार, १४ दुचाकी असा तब्बल १ कोटी ९ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जुगार अड्ड्याचे मालक, चालक यांच्यासह ४५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता सुरू असून ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू आहेत तेथील प्रभारी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत महानिरीक्षक फुलारी यांनी खरा पंचनामाशी बोलताना दिले आहेत. 


सातारा, पुणे जिल्ह्यातील काहींनी खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथे जुगार अड्डा सुरू केला होता. या जुगार अड्ड्यावर या दोन्ही जिल्ह्यातील जुगारी येत असून कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत असल्याची माहिती महानिरीक्षक श्री. फुलारी यांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या जुगार अड्ड्यावर साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांना स्वतः कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अधीक्षक घुगे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक संदीप जगताप तसेच अन्य अधिकारी, अंमलदारांचे एक विशेष पथक तयार केले होते. गुरुवारी रात्री या पथकाने धनगरवाडी येथे छापा टाकून जुगाऱ्यांसह अड्ड्याचे चालक, मालक यांना ताब्यात घेतले. 

याप्रकरणी सातारा आणि पुणे जिल्ह्यातील एकूण ४५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जुगार अड्डा चालवणारे रमजान उर्फ मुन्ना शेख (रा. शिरवळ), जागा मालक रमेश मोटे (रा. धनगरवाडी) यांच्यासह जुगार खेळणाऱ्या ४३ जणांचा समावेश आहे.  


संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असतानाही शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डा सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर विशेष महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी थेट अधीक्षक शेख यांनाच कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. निवडणूक काळात कोल्हापूर परिक्षेत्रातील ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असतील तेथील प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी दिले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.