"महाराष्ट्राचा महा एक्झिट पोल"
महाआघाडीला १३० ते १४०, महायुतीला १२५ ते १३५ जागा मिळणार!
तिसऱ्या आघाडीसह अन्य १५ ते ३५ जागांवर विजयी होतील!
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी गुरुवारी एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात मतदान पार पडले. यंदा मतदानाच्या टक्केवारीत तीन ते पाचने वाढ झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे वाढलेला टक्का कोणाला आधार देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान खरा पंचनामाच्या टीमने मतदानोत्तर केलेल्या सर्व्हेमध्ये महाआघाडी आणि महायुतीमध्ये काटे की टक्कर असल्याचे चित्र दिसून आले. एकंदरीत राज्यात महाविकास आघाडीला १३० ते १४० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीला १२५ ते १३५ जागा मिळतील. यंदाच्या विधानसभेत अपक्ष तसेच छोट्या पक्षांची भूमिका महत्वाची राहणार असून त्यांच्या साथीने नवीन सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे. तिसरी आघाडी, छोटे पक्ष तसेच अपक्ष १५ ते ३५ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे.
महाआघाडी आणि महायुतीने केलेल्या जोरदार प्रचारानंतर खरा खेळ प्रचार बंद झाल्यानंतर सुरू होता. त्यातच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील आलिशान हॉटेलमध्ये बसून पाच कोटी रूपये वाटल्याचा आरोप करण्यात आला. त्याचे काही व्हिडिओही बहुजन विकास आघाडीने सोशल मिडियावर व्हायरल केले. त्यानंतर चांगलाच राजकीय धुरळा उठला. याची चर्चा सुरू असतानाच कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना पैसे वाटताना रंगेहात पकडल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला. दोन्ही बाजूंकडून पैसे वाटपाचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यातच तावडे यांना मुद्दामहून स्वपक्षीयांनीच अडकवल्याची चर्चा झाली. अशा वातावरणातच गुरुवारी मतदान पार पडले.
संपूर्ण राज्यात सर्रासपणे पैसे वाटप झाल्याचे दिसून आले. महायुतीने राबवलेल्या योजना, जातिनिहाय बसवलेली गणिते याआधारे अन्य मार्गाने मतदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. तर आघाडीने गुजरात विरूद्ध मराठी अस्मिता, बेरोजगारी, संविधान, महागाईसह महायुतीला तोड देणाऱ्या योजनांसह अन्य मार्ग मतदानादिवशी अलवंबल्याचे दिसून आले. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर विविध वृत्तसंस्था, एजन्सी यांच्या एक्झिट पोलची चर्चा माध्यमांवर सुरू झाली. मतदानानंतर साधारण दहा संस्थांचे एक्झिट पोल समोर आले. त्यातील सहा पोलमध्ये महायुतीला तर चार पोलमध्ये महाआघाडीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान 'खरा पंचनामा'च्या टीमनेही राज्यात काही अंशी मतदारांचा कल लक्षात घेऊन एक्झिट पोल केला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीला १३० ते १४० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीला १२५ ते १३५ जागा मिळतील. तिसरी आघाडी, छोटे पक्ष तसेच अपक्षांना १५ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याने अपक्षांचा भाव चांगलाच वधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून शर्यतीत असलेल्या अपक्ष, छोटे पक्षांशी आतापासूनच संपर्क साधण्यात येत आहे. भाजपला पुन्हा सत्तेत यायचे असल्याने त्यांनीही वेगळ्या पद्धतीचे ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. तर महाविकास आघाडीने कॉंग्रेसचे संकटमोचक आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मैदानात उतरवले आहे.
महायुतीकडून गृहमंत्री अमित शाह यांच्या चाणक्यनीतीनुसार पावले टाकली जात आहेत. तर देशाचे माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या नीतीनुसार डी. के. शिवकुमार आतापासूनच फिल्डींग लावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निकालानंतर सत्ता स्थापनेचा दावा कोणाकडून केला जाणार याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागून राहीली आहे. दुसरीकडे भाजप विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल पण महाआघाडीची निवडणुकपूर्व आघाडी असल्याने नियमानुसार राज्यपालांना आघाडीला सत्ता स्थापनेसाठी बोलवावे लागणार आहे. मात्र आघाडीकडे संख्याबळ नसल्यास राज्यपाल भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे निकालात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.