महाराष्ट्रातील चार सभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा उल्लेख टाळला
मुंबई : खरा पंचनामा
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन शिगेला पोहोचली आहे. मतदानासाठी शेवटचे आठ-दहा दिवस राहिले आहेत. अशावेळी महाराष्ट्रात प्रचारसभांची रणधुमाळी सुरु आहे. महायुतीचया प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले आहेत. दोन दिवसांत झालेल्या चारही सभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर किंवा शरद पवार यांच्यावर थेट टीका करणे टाळले आहे. मोदींनी त्यांच्या भाषणात शरद पवारांचा उल्लेखही केलेला नाही.
महाराष्ट्रात भाजप प्रणित महायुतीचे सरकार आहे, हेच सरकार पुन्हा सत्तेवर यावे साठी भाजपचे केंद्रीय नेते जोरदार कामाला लागले आहेत. सरकारने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामाची उजळणी केली जात आहे. तर पंतप्रधान मोदींकडून आज अकोला आणि नांदेड जिल्ह्यातील सभेत नव्या योजनांची माहिती देण्यात आली. तीन कोटी घरे बांधण्याचे लक्ष्य आमच्या सरकारने ठेवले असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना काँग्रेस आणि महाविकास आघाडी असा उल्लेख करत महाविकास आघाडी विकासविरोधी असल्याची टीका केली. मात्र त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केला नाही.
पंतप्रधान मोदींच्या राज्यात चार सभा झाल्या मात्र लोकसभेवेळी ज्या पद्धतीने ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाविरोधात आक्रमक होते, तो आक्रमकपणा दिसलेला नाही. शरद पवार गटाचा तर दोन दिवसात झालेल्या एकाही सभेत त्यांनी उल्लेख सुद्धा केला नाही. लोकसभा निवडणुकीवेळी पुण्यातील सभेत त्यांनी भटकती आत्मा आणि अतृप्त आत्मा म्हणत पवारांवर निशाणा साधला होता. विशेष म्हणजे त्यावेळी अजित पवार हे मंचावर उपस्थित होते.
शरद पवारांवरील टीकेचा परिणाम महायुतीला लोकसभेत दिसून आला होता. फक्त दहा जागा लढणाऱ्या शरद पवार गटाचे आठ उमेदवार विजयी झाले होते. बारामतीमध्ये देखील अजित पवारांच्या पत्नीचा पराभव झाला आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या. एक प्रकारे शरद पवारांवरील टीका भाजप आणि महायुतीवर बुमरँग झाली होती. महाराष्ट्राची जडणघडण ही वेगळी आहे. येथे ज्येष्ठ नेतेच नाही तर व्यक्तीबद्दलही महाराष्ट्रात आदराने बोलण्याची पद्धत आहे. विरोधकांवर वैयक्तीक टीका- टीप्पणी करण्याची परंपरा राज्यात नाही. अपवाद फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा. त्यामुळे लोकसभेतील शरद पवारांवरील टीकेनंतर अजित पवारांनी म्हटले होते, की मी त्यांना भेटल्यावर याबद्दल बोलेल. अजित पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये पवारांबद्दल काय बोलावे आणि काय बोलू नये याविषयी सल्ला मसलत झाली आहे का, अशी चर्चा आता मोदींच्या दोन दिवसांतील चार सभांनंतर राजकीय वर्तुळात होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.