"महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी नवी नावंही येऊ शकतात"
मुंबई : खरा पंचनामा
"महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी नवी नावंही समोर येऊ शकतात", असं सूचक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. तर निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. निकालानंतर राज्यात महायुती की महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार याचा फैसला होणार आहे.
मात्र, याआधीच युती आणि आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. शिवाय दोन्ही बाजूंनी मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा निर्णय निकालानंतर घेणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. अशातच आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी नवी नावंही समोर येऊ शकतात. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये जो प्रयोग करण्यात आला तसाच प्रयोग महाराष्ट्रात होऊ शकतो, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.
दरम्यान, विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह भाजपचे केंद्रीय नेतृत्व चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतील. राज्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवलं जाईल, असंही तावडेंनी स्पष्ट केलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.