गुंड म्हमद्या नदाफचा सांगलीत गोळीबार, एकजण गंभीर जखमी
म्हमद्या, पप्पू फाकडेसह चौघांवर गुन्हा दाखल; शहरासह जिल्ह्यात खळबळ
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील नामचीन गुंड म्हमद्या नदाफ याने पप्पू फाकडे याच्या आर्थिक हितसंबंधाशी धोका निर्माण झाल्याने म्हमद्याने एकावर पिस्तूलातून गोळीबार केला. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास गणेशनगर येथील सर्वधर्म चौकात ही घटना घडली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुंड म्हमद्यासह चौघांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी म्हमद्या नदाफ आणि फारूख नदाफ याला ताब्यात घेतले आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत गोळीबाराची घटना घडल्याने सांगली शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
महमद जमाल नदाफ, इम्रान दानवडे, पप्पू फाकडे, फारूख मुस्ताफ नदाफ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सलीम मकबूल मुजावर (वय ४२, रा. सर्वधर्म चौक, गणेशनर, सांगली) असे यातील जखमीचे नाव आहे. म्हमद्याच्या टोळीतील इम्रान दानवडे याचे पप्पू फाकडे याच्याशी आर्थिक हितसंबंध आहेत. तर जखमी सलीम मुजावर याचे अजय माने याच्याशी संबंध आहेत. अजय माने याच्याशी असलेल्या संबंधामुळे फाकडे आणि दानवडे यांच्या आर्थिक संबंधास सलीम याच्यामुळे धोका निर्माण झाल्याचा संशय म्हमद्यासह अन्य संशयितांना होता.
त्यामुळे फारूख नदाफ याला सलीम मुजावरला फोन करायला सांगून गुरुवारी रात्री घराबाहेर बोलावले. तो बाहेर आल्यानंतर म्हमद्याने त्याच्या कमरेला लावलेले पिस्तूल काढून त्याच्या छातीवर गोळी झाडली. या घटनेनंतर शहरात खळबळ उढाली. या घटनेनंतर एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे, सांगली शहरचे निरीक्षक संजय मोरे, एलसीबीचे उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी सलीमला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रू्ग्णालयात दाखल केले. त्यानंतर तातडीने हालचाली करत गुंड म्हमद्या नदाफ आणि फारूख नदाफ यांना ताब्यात घेतले. तर फाकडे आणि दानवडे पसार झाले आहेत. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऐन निवडणुकीत गोळीबार, पोलिसांचे अपयश
सध्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पोलिसांनी जिल्ह्यासह आंतरराज्य सीमांवर तपासणी नाके उभे केले आहेत. तरीही हद्दपार असणारा गुंड म्हमद्या नदाफ सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात येऊन गोळीबार करतो हे पोलिसांचे अपयश असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी कर्नाटकात म्हमद्याला तेथील पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून आलिशान कारसह पिस्तूल जप्त करण्यात आले होते. म्हमद्या नदाफला मोका खटल्यात जामीन मंजूर करताना त्याला महाराष्ट्रात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तरीही म्हमद्याने ऐन निवडणुकीत सांगलीत येऊन गोळीबार केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.