बलात्कार करणाऱ्या तरूणाला दहा वर्षे तुरूंगवासाची शिक्षा
सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल, एपीआय पंकज पवार यांनी केला होता तपास
सांगली : खरा पंचनामा
तासगाव येथे ओढ्यावर धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या तरूणास दहा वर्षे तुरुंगवास तसेच पाच हजार रूपये दंड व दंड न दिल्यास १५ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. सांगलीतील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एम. एस. काकडे यांनी शनिवारी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन नरवाडकर यांनी काम पाहीले. गुन्ह्याचा तपास तासगाव पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी केला होता.
पांडुरंग श्रीरंग केंगार (वय २६, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव) असे शिक्षा झालेल्या तरूणाचे नाव आहे. दि. २६ आक्टोबर २०२० रोजी पीडित महिला इंदिरानगर झोपडपट्टी येथील ओढ्यावर धुणे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी केंगार तेथे दुचाकीवरून आला. त्याने पीडितेचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने दुचाकीवरून वंजारवाडी येथे एका घरात नेले. तेथे जीवे मारण्याची धमकी देऊन सलग चार दिवस तिच्यावर बलात्कार केला. तेथून सुटका करून घेतल्यानंतर पीडितेने तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार केंगार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी केला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यांची साक्ष तसेच सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद, सर्वोच्च, उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे ग्राह्य धरून न्या. काकडे यांनी केंगार याला दोषी धरून दहा वर्षे तुरुंगवास तसेच पाच हजार रूपये दंड व दंड न दिल्यास १५ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.