मंदिर, घरे फोडणाऱ्या तरूणाला अटक
१२.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त, इस्लामपूर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
इस्लामपूर शहरासह चिंचणी वांगी, कडेगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील घरे फोडणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याच्याकडून चोरीचे १२.७३ लाख रूपये किमतीचे दागिने, एक दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.
राहुल प्रकाश माने (वय ३२, रा. इस्लामपूर, मूळ रा. वाकुर्डे बुद्रुक, ता. शिराळा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रेठरेहरणाक्ष येथील राणी कोळेकर घर बंद करून गावी गेल्यानंतर त्यांचे घर फोडून ७१ हजारांची रोकड लंपास करण्यात आली होती. दि. ५ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. यातील संशयितांना तातडीने पकडण्याच्या सूचना निरीक्षक हारूगडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानंतर पथक चोरट्यांचा शोध घेत होते.
कोळेकर यांच्या घरात चोरी केलेला संशयित शाहुनगर परिसरात फिरत असल्याची माहिती निरीक्षक हारूगडे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पथकाने तेथे जाऊन संशयित तरूणाला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्या खिशात वीस हजारांची रोकड सापडली. त्या पैशांबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने रेठरेहरणाक्ष येथील एक घर फोडून तेथून रोकड चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याने चिंचणी वांगी, कडेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतही मंदिर आणि घरे फोडून ऐवज लंपास केल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडून चोरीचे १२.७३ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. तसेच त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली.
इस्लामपूरचे पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, शशिकांत शिंदे, अमोल सावंत, विशाल पांगे, सतीश खोत, दीपक गस्ते, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, विवेक साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.