कवठेमहांकाळजवळ सुगंधी तंबाखूचा अवैध साठा जप्त
१२.१२ लाखांचा मुद्देमाल पकडला, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे-रांजणी रस्त्यावर अवैधरित्या सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारी कार पकडून साताऱ्यातील एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून विविध कंपन्यांची सुगंधी तंबाखू, इनोव्हा कार असा १२.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस सतीश शिंदे यांनी दिली.
ललित सुमेरमल कच्छिया (वय ५७, रा. बोपेगाव, ता. वाई, जि. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या सुगंधी तंबाखू, गुटखा याची वाहतूक, विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथक कवठेमहांकाळ परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पथकाला कोकळे-रांजणी रस्त्यावरून एका इनोव्हा (एमएच ०१ एएम ४५३७) कारमधून सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली.
पथकाने सापळा रचून ती कार अडवली. तिची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये विविध कंपन्यांच्या सुगंधी तंबाखूची पोती सापडली. त्याबाबत गाडीचा चालक कच्छिया याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने ती तंबाखू कर्नाटकातून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर कारसह तंबाखू जप्त करून त्याला अटक करण्यात आली. याबाबत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो मिरज शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, गणेश शिंदे, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, विवेक साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.