तासगाव अर्बन बॅंकेत चोरीचा प्रय़त्न करणाऱ्या सराईताला अटक
दोन गुन्हे उघडकीस, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील मार्केट यार्ड परिसरातील तासगाव अर्बन बॅंकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. यातील दोन संशयित पसार झाले आहेत. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. अन्य दोन संशयितांना लवकरच अटक करू अशी माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
ओंकार विशाल साळुंखे (वय १९, रा. जुना बुधगाव रस्ता, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सुदर्शन यादव (रा. विश्रामबाग, सांगली, मूळ रा. कराड), मुनीब उर्फ बाबू भाटकर (रा. अंबा चौक, सांगली) अशी पसार झालेल्या चोरट्यांची नावे आहेत. बुधवारी सांगलीतील मार्केट यार्ड परिसरातील तासगाव अर्बन बॅंकेच्या शाखेत तीन संशयितांनी कडी कोयंडा उचकटून कॅशियर रूममध्ये चोरीचा प्रय़त्न केला होता. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते.
संशयितांचा शोध घेत असताना पथकातील विक्रम खोत यांना हा चोरीचा प्रय़त्न साळुंखे, यादव, भाटकर यांनी केल्याची तसेच ओंकार साळुंखे तात्यासाहेब मळा परिसरात लपल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील सॅकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये एक कोयता, कटावणी, मारतूल, चाकू सापडला. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने यादव आणि भाटकर यांच्या साथीने बॅंकेत चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. तसेच शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक बंद घर फोडून चांदीचे दागिने चोरल्याचीही कबुली दिली. त्याला तातडीने अटक करून विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली, मिरज तसेच कराड पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, संदीप गुरव, सागर लवटे, अमर नरळे, संदीप नलावडे, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.