Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिस प्रशिक्षण केंद्रातून तोतया पोलिसाला अटक

पोलिस प्रशिक्षण केंद्रातून तोतया पोलिसाला अटक



दौंड : खरा पंचनामा

नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात पोलिस दलातील चालक असल्याची बतावणी करून वावरणार्या एका तोतया पोलिसाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तोतया पोलिसाने प्रशिक्षण केंद्राचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याने त्याच्या हेतूची चौकशी केली जात आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी या बाबत माहिती दिली. जय राजेंद्र यादव (वय- २५, रा. विर्शी, ता. भातकुली, जि. अमरावती) या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी जय यादव या तरूणाने नानवीज येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावर पोलिस दलात चालक असल्याचे सांगत प्रवेश मिळविला. राज्य पोलिस दलाचे बोधचिन्ह असलेले शारीरिक प्रशिक्षणाचे टी शर्ट व पॅण्ट असा पेहराव करीत त्याने केंद्रात प्रवेश केला.

दरम्यान जय यादव याने त्याच्याकडील मोबाइल संचात प्रशिक्षण केंद्राच्या आवारातील इमारती, कार्यालये व मैदानाचे छायाचिक्षण करीत व्हिडिओ चित्रण देखील केले. राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या आत व्हिडिओ चित्रण सुरू असल्याने व जय यादव याचे वर्तन शंकास्पद असल्याचे लक्षणात आल्याने कर्तव्यावरील अंमलदारांना त्याची शंका आल्याने त्यांनी त्याला थांबवून विचारणा केली.

चौकशीत त्याने अमरावती जिल्हा पोलिस दलात चालक असल्याचे सांगितले. तसेच नानवीज येथे एका वर्षापूर्वी चालकाचे प्रशिक्षण घेतल्याचा त्याने दावा केला. त्याने राज्य राखीव पोलिस दलाचे हुबेहुब ओळखपत्र तयार करून घेतले होते, परंतु त्यावर कोणत्याही वरिष्ठ अधिकार्याची स्वाक्षरी व हुद्दा नमूद करण्यात आला नव्हता.

दौंड पोलिस ठाण्यात राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रातील उप निरीक्षक दत्तू शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार जय यादव याच्याविरूध्द भारतीय न्याय संहिता मधील कलम ३३३ (दुखापत, हल्ला किंवा अन्य कृत्य करण्याच्या उद्देशाने गृह अतिक्रमण करणे ) व कलम २०५ (लोकसेवक वापरतात त्याप्रकारचा गणवेश किंवा ओळखचिन्ह कपटी उद्देशाने परिधान करणे) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी केलेल्या अंगझडतीत जय यादव याच्याकडे पोलिस पेहरावातील टोपी, शारीरिक प्रशिक्षण व कवायतीचे बूट, कंबरपट्टा, आढळून आले. राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रवेश करण्याचा आणि व्हिडिओ चित्रण करण्याचा जय यादव याचा नेमका हेतू दौंड पोलिस तपासत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.