एका चपलेमुळे गेली कल्याणमधील 11 पोलिसांची नोकरी!
कल्याण : खरा पंचनामा
कल्याणमध्ये एका चप्पलेमुळे तब्बल 11 पोलिसांची नोकरी गेल्याची विचित्र घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे पडसाद आता उमटले असून या एका चप्पलेमुळे 11 पोलिसांचं निलंबन झालं आहे. कल्याणच्या उपायुक्तांनी ही कठोर कारवाई केली असून 11 जण निलंबित झालेत.
हा सारा प्रकार 21 डिसेंबर रोजी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात घडला होता. दुपारच्या सुमारास न्यायालयीन कामकाज सुरु असताना एका किरकोळश्या कारणावरुन आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या 22 वर्षीय किरण संतोष भरम नावाच्या तरुणाने अतिरिक्त व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या दिशेने पायातली चप्पल भिरकावली. न्यायमूर्तीच्या दिशेने आरोपीने चप्पल फेकून मारल्याने न्यायालयामध्ये एकच गोंधळ उडाला. या प्रकरणामध्ये सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याच्या आरोपाखाली आरोपीविरुद्ध नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला. महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाची चौकशीला सुरुवात झाली. साहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. मात्र हा तपास सुरु असतानाच आता पोलिसांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे.
खडकपाडा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात किरण भरमला शनिवारी दुपारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. जी. वाघमारे यांच्या समोर दिलेल्या तारखेप्रमाणे हजर करण्यात आलं. किरणनने न्यायालयामध्ये दुसऱ्या न्यायाधीशांकडे सुनावणी करण्याची मागणी केली. न्यायालयाने किरणला तुमच्या वकिलामार्फत तसा अर्ज द्यावा, असे सांगितलं. यानंतर न्यायालयीन सेवकाने इसमाच्या वकिलाच्या नावाचा पुकारा करत वकिलाने हजर राहण्याचे सूचित केले. इसमाचा वकील न्यायालयासमोर आलाच नाही. न्यायालयाने आरोपी किरणला दुसरा वकील देण्याची सूचना केली आणि याप्रकरणी पुढील तारीख दिली. न्यायालयाने पुढची तारीख दिल्यानंतर किरणने आरोपीच्या पिंजऱ्यामध्येच खाली वाकत पायाची चप्पल काढली आणि हातात घेऊन आजूबाजूच्या पोलिसांना काही कळण्याआधीच ती न्या. वाघमारेंकडे भिरकवली.
सुदैवाने चप्पल न्यायमूर्तीपर्यंत पोहचली नाही. ही चप्पल न्यायाधिशांच्या समोरील लाकडी दांड्याला लागून बाजूला बसलेल्या कर्मचाऱ्यार समोरच पडली. घडलेल्या घटनेची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळेंनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक अरूण कोकीतकर यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात किरणविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय कामात अडथळा आणि पोलिसांना शासकीय कर्तव्य करण्यापासून परावृत्त केल्याचा ठपका ठेवत किरणवर नवा गुन्हा दाखल करण्यात आला.
कल्याण न्यायालयाच्या आवारात घडलेल्या या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा केल्याप्रकरणी 11 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. कल्याण न्यायालयात न्यायाधीशावर एका कैदीने चप्पल भिरकावल्याच्या प्रकरणाबरोबरच अन्य एका प्रसंगी एक इसम बंदूक घेऊन कल्याण न्यायालयाच्या आवारात फिरत असल्याचं समोर आलं होतं. दोन्ही प्रकरणांमध्ये संयुक्तरित्या ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेत पोलीस मुख्यालय आणि कल्याणच्या उपायुक्तांनी 11 पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.