"बीडमध्ये 1,222 शस्त्र परवाने कोणाच्या आशीर्वादाने?"
मुंबई : खरा पंचनामा
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचा प्रमुख संशय असलेले वाल्मिक कराड फरार आहेत. त्यांच्यासह आणखी दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईड आणि फरार आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणीने जोर धरला आहे.
विविध पक्षांच्या नेत्यांसह सामाजिक कार्यकर्तेही संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन आक्रमक झाले आहेत. बीड जिल्ह्यात 1,222 शस्त्र कशासाठी देण्यात आले आणि कोणाच्या आशीर्वादाने देण्यात आले असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
अंजली दमानिया यांनी एक व्हिडिओ ट्विट करुन बीडमधील शस्त्रपरवाना धारकांची यादी समोर आणली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टममाईड समजला जाणारा वाल्मिक कराड यांच्या नावावर परवानाधारक शस्त्र असल्याची नोंद आहे. तर त्यांच्याच गँगमधील कैलाश फड आणि निखील फड यांच्याकडे शस्त्राचा परवाना नाही, मात्र त्यांच्याकडे शस्त्र असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. या दोघांनाही पोलीस अधीक्षकांनी तत्काळ अटक करावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील 1,222 लोकांकडे शस्त्र परवाना असल्याची अधिकृत नोंद आहे. एवढ्या लोकांना बंदुका देण्याचे कारण काय आहे? शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर बीड जिल्ह्यातील शस्त्र परवानाधरकांची यादी आहे, त्यात वाल्मिक कराड यांचेही नाव आहे. मात्र त्यांच्या गँगमधील कैलाश फड आणि निखील फड यांचे नाव या यादीत नाही. विशेष म्हणजे या दोघांनी काही दिवसांपूर्वी हवेत गोळीबार केला होता.
दमानिया म्हणाल्या की, बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना मेसेज करुन याची माहिती दिली आहे. त्यांनी कैलाश आणि निखील फड यांना तत्काळ अटक करावी आणि वाल्मिक कराड गँगला पहिला दणका द्यावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत झालेल्या संशयास्पद मृत्यू मुळे परभणी देखील सध्या चर्चेत आहे. या जिल्ह्यात फक्त 32 जणांकडे शस्त्र परवाना आहे. तर अमरावती ग्रामीण मध्ये 243 जणांकडे शस्त्राचे परवाने आहेत. याच्या दुप्पट, तिप्पट शस्त्र परवाने बीडमध्ये का आणि कोणाच्या आशीर्वादाने दिले गेले, असा संतप्त सवाल दमानिया यांनी उपस्थित केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.