पतसंस्थेच्या वसुलीचे पैसे चाकूच्या धाकाने लुटणाऱ्याला अटक
कोंत्याव बोबलाद येथे सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कर्जाचे वसूल केलेले १.१५ लाख रूपये घेऊन जाणाऱ्या पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला अडवून त्याला डोळ्यात चटणी टाकत, चाकूचा धाक दाखवत रोकड लुटल्याप्रकरणी लवंगा (ता. जत) येथील एका तरूणाला अटक करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. या गुन्ह्यातील अन्य चार संशयित पसार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सचिन परशुराम कांबळे (वय २४, रा. लवंगा, ता. जत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या गुन्ह्यात लवंगा येथील सुनील लोखंडे, सचिन बिराजदार-पाटील, परशुराम कांबळे, गिरगाव येथील हंजाप्पा मांग हे संशयित पसार झाले आहेत. इंडी पतसंस्थेच्या चडचण शाखेत श्रीधर बगली कर्ज वसुलीचे काम करतात तर पालकशी व्यंकटची कर्ज वसुली व्यवस्थापक पदावर काम करतात. दि. ४ डिसेंबर रोजी गिरगाव येथील कर्जदारांकडून वसूल केलेली १.१५ लाखांची रोकड घेऊन पालकची दुचाकीवरून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांची गाडी अडवली. त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोकड लुटली होती. याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे विशेष पथक तयार केले होते.
पथक जत परिसरात गस्त घालत असताना लवंगा येथील सचिन कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याची तसेच सचिन कांबळे कोंत्याव बोबलाद येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे छापा टाकून सचिन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला अटक करून उमदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, उमदीचे सहायक निरीक्षक संदीप कांबळे, संदीप गुरव, सतीश माने, आमसिद्ध खोत, अमर नरळे, संदीप नलवडे, विक्रम खोत, उमदी पोलिस ठाण्याकडील संतोष माने, इंद्रजित गोदे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.