"३ लाख कोटींचं कर्ज ९ लाख कोटींपर्यंत पोहोचलं, महाराष्ट्र आता थांबणार नाही"
नागपूर : खरा पंचनामा
विधानसभेतील अंतीम आठवठा प्रस्तावाच्या चर्चेत माननीय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंतराव पाटील यांनी सहभाग घेतला. भारतीय जनता पक्षाच्या २०१४ सालच्या जाहीरनाम्यात 'महाराष्ट्र आता थांबणार नाही' हे वाक्य होतं.
परंतु महाराष्ट्रावर तेव्हा ३ लाख कोटी रुपयांचं कर्ज होतं आणि आता आपण ९ लाख कोटींपर्यंत पोहोचलो आहोत, असे म्हणत त्यांनी भाजपच्या घोषणेची खिल्ली उडवली तसेच शासनाच्या कारभावावर नाराजी व्यक्त केली.
एमआयडीसीची ताकद वाढवली जाईल, असं आश्वासन भाजपने दिलं होतं. पण राज्यातल्या कंपन्या बाहेर जात आहेत, याकडे जयंत पाटील यांनी आवर्जून सरकारचे लक्ष वेधले. तसेच महाराष्ट्रात मोठा प्रकल्प यावा, अशी जनतेची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच भारतीय जनता पक्षाने मागील दहा वर्षांमध्ये दिलेल्या सर्व आश्वासनांची आठवण जयंतरावांनी सरकारला करून दिली. 'प्राण जाए पर वचन न जाए' या युक्तीप्रमाणे ही सर्व आश्वासने पूर्ण करावीत, अशी टोलेबाजीही जयंत पाटील यांनी केली.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील १० वर्षांत पूर्ण झाले नाही ते लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे. महाराष्ट्रात मुदत संपली असतानाही टोल नाके सुरु आहेत, याकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. महाराष्ट्राला टोलमुक्त करण्याची संधी सरकारकडे आहे, त्यांनी तो करून दाखवावा असे आव्हान जयंतरावांनी सरकारला दिले.
मराठी शाळा बंद होत आहेत याकडे शासनाने लक्ष द्यावे. महिला अत्याचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि महिला बेपत्ता घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी सूचना पाटील यांनी सभागृहात केली. 'लाडकी बहीण योजने' मध्ये वय वर्ष ६५ च्या वरील महिलांचाही समावेश करून घ्यावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. तसेच एकाही लाडक्या बहिणीचं नाव कमी न करता सरकार आपले आश्वासन पूर्ण करू शकतो, असा विश्वासही जयंतरावांनी व्यक्त केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.