हरभरे खाल्ले नाहीत म्हणून पत्नीकडून पतीला बेदम मारहाण
घाबरलेल्या पतीची पोलिसात धाव
पुणे : खरा पंचनामा
पुणे शहरातील सोमवार पेठ भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरुन पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. या महिलेने लाटणं आणि मिक्सरच्या भांड्याने पतीला बेदम मारहाण केली, तसेच करंगळीचा चावा घेऊन नख देखील तोडले.
या प्रकरणी सोमवार पेठ येथील त्रिशुंड गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या ४४ वर्षीय व्यक्तीकडून त्याच्या चाळीस वर्षीय पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक डिसेंबरला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. तक्रारदाराने घरात मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरून त्यांच्या पत्नीने शिवीगाळ करून त्यांना लाटण्याने तळ हातावर, डोक्यात, पाठीवर मारले. तक्रारदाराने पत्नीच्या हातातील लाटणे हिसकावून घेतले. त्यामुळे चिडलेल्या पत्नीने मिक्सरचे भांडे घेऊन दोन वेळा तक्रारदाराच्या डोक्यात मारले. त्यानंतर पत्नीने तक्रारदाराची पँट खाली ओढल्यामुळे तक्रारदार खाली बसले आणि स्वरक्षणासाठी दोन्ही हात वर करून डोके झाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्नीने रागाच्या भरात पतीच्या हाताच्या करंगळीला चावून नख तोडले. तसेच, हाताच्या नखांनी तोंडावर, गालावर, डाव्या कानाच्या पाठीमागे तसेच पोटाला ओरखडले. या घटनेनंतर घाबरलेल्या पतीने पोलिसात धाव घेतली. पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगत तक्रार दाखल केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.