तासगावमधील दोन पोलिस अंमलदार निलंबित
रोहित फाळके खूनप्रकरण, संशयिताला वारंट बजावणीत दिरंगाई केल्याने कारवाई
सांगली : खरा पंचनामा
तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्ववैमनस्यातून ओंकार उर्फ रोहित फाळके याच्या खूनप्रकरणातील संशयित सराईत गुन्हेगार विशाल फाळके याला वेळेवर वारंट बजावणी न केल्याने तासगाव पोलिस ठाण्याकडील दोन पोलिस अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे. सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सोमवारी ही कारवाई केली आहे
वारंट बजावणी अंमलदार वेदकुमार दौंड, पैरवी अंमलदार पवन जाधव अशी निलंबित करण्यात आलेल्या अंमलदारांची नावे आहेत. वायफळे येथील विशाल फाळके आणि मृत ओंकार फाळके यांच्या कुटुंबीयांमध्ये गेल्या काही वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहेत. याच वादातून दोन्ही कुटुंबाने एकमेकांवर यापूर्वीही धारदार शस्त्राने हल्ले केले आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. ओंकारच्या कुटुंबियांनी विशालसह त्याच्या कुटुंबियांविरोधात केलेल्या तक्रारीची केस मागे घेण्यासाठी विशालने साथीदारांसह मृत रोहितसह त्याच्या कुटुंबियांवर तलवारी, कोयत्याने हल्ला केला होता. यात रोहितचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी विशाल फाळके याला खेड-शिवापूर येथून अटक करण्यात आली आहे. तर त्याच्या अन्य साथीदारांनाही सोमवारी अटक करण्यात आली.
विशाल फाळके सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तासगाव, पुण्यातील भारती विद्यापीठ, वारजे-माळवाडी, बिबवेवाडी, शिवाजीनगर या पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोकाअंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. विशाल याला वारंट बजावण्यात दिरंगाई केल्याची बाब चौकशीत निष्पन्न झाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दौंड आणि जाधव दोघांनाही निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.