'जाणीवपूर्वक तपासास विलंब करत आहात का?'
मुंबई : खरा पंचनामा
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित एन्काऊंटर प्रकरणाच्या तपासाबाबत सीआयडी गंभीर नाही. जाणीवपूर्वक तपासास विलंब करत आहात का? असा सवालच मुंबई उच्च न्यायालयाने सीआयडीला केला आहे. तसेच 20 जानेवारीपर्यंत न्यायालयीन चौकशीकरता पोलीस तपासाची सगळी कागदपत्रे जमा करण्याचे सीआयडीला निर्देश देण्यात आले.
अक्षय शिंदेच्या वडिलांनी एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप करत हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरील पुढील सुनावणी 20 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
इतके दिवस झाले तरी राज्य सरकार तपासाबाबत गंभीर दिसत नाही अस उच्च न्यायालयाने म्हटलं. तुमच्याकडून काय अपेक्षा होती, आणि तुम्ही काय करताय? अशा शब्दात उच्च न्यायालयाने सीआयडीला फटकारलं. त्यावर या प्रकरणात अजूनही साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचीच प्रक्रिया सुरू असल्याची सीआयडीकडून कोर्टात माहिती देण्यात आली.
उच्च न्यायालयाने सांगितले की, "चांगल्या तपासासाठी, स्थानिक पोलिसांकडून प्रकरणे घेतली जातात आणि सीआयडीकडे दिली जातात. सर्व कागदपत्रे गोळा करून योग्य तपासासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सोपवली जावीत असा त्यांचा प्रयत्न असतो. प्रत्येक बाबतीत निष्पक्षता असली पाहिजे. येथेही तपासाचा अधिकार आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांना आहे." त्यानंतर सर्व कागदपत्रे आणि माहिती दंडाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली असून ते एका आठवड्यात सुपूर्द करण्यात येतील, असे खंडपीठाला सांगण्यात आले.
तुमच्या कार्यपद्धतीमुळेच तुमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तुम्ही नेमका काय तपास केला? तुम्हाला वारंवार मुदत देऊनही वैद्यकीय कागदपत्रे का गोळा केली नाही? तुम्ही जाणीवपूर्वक त्यास विलंब करीत आहात का? आता आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका, अशा शब्दांत खंडपीठाने सीआयडीची कानउघाडणी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.