एकनाथ शिंदेंच्या बैठका रद्द, अजितदादा दिल्लीला रवाना, फडणवीसांच्या भेटीला नेत्यांची रीघ
मुंबई : खरा पंचनामा
विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले. स्पष्ट बहुमत असतानाही मुख्यमंत्री, खातेवाटप याबाबत अद्याप काहीच ठरलं नसल्याचे दिसतेय. भाजपकडून शिंदेंच्या परस्पर शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली. दुसरीकडे शिंदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं, पण ते गृहमंत्रालयासाठी अडून बसल्याचं बोलले जातेय. महायुतीमधील महाराष्ट्रातील तिन्ही नेत्यांनी दिल्लीवारी केली. पण तरीही त्यात तोडगा निघाला नाही.
आता पुन्हा एकदा दिल्लीवारी होणार असल्याच्या बातम्या आल्या. पण त्यातही ट्वीस्ट आला. एकनाथ शिंदे यांनी आजच्या सर्व बैठका, भेटीगाठी रद्द केल्या. तर दुसरीकडे अजित पवार दिल्लीला जाणार आहेत. सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी रांगा लावल्या आहेत. त्यामुळे महायुतीचं नेमकं काय चाललेय? पडद्यामागे काही शिजतेय का? याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे.
सत्तास्थापनेच्या घडामोडीला भाजप, महायुतीमध्ये वेग आलाय. पण मुख्यमंत्री कोण होणार? गृहखातं कुणाकडे? अर्थ खातं अजित पवार यांच्याकडेच राहणार का? हे सर्व गुलदस्त्यातच आहे. त्यातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून गृहखात्यावर दावा ठोकण्यात आलाय. ज्याच्याकडे उपमुख्यमंत्रिपद असते, त्यांच्याकडेच गृहखाते असेल, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय. शिवसेना नेत्यांनी उघड उघड भूमिका घेतल्यामुळे भाजपची कोंडी झाल्याचं बोलले जातेय. आता यावर तोडगा कधी निघणार? ५ तारखेच्या शपथविधीली एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का? या चर्चेनं जोर धरलाय.
एकनाथ शिंदे दरे गावात जातात तेव्हा मोठा निर्णय घेतात, असा दावा संजय शिरसाट यांनी केला होता. रविवारी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या निर्णयाला आमचा बिनशर्त पाठिंबा असेल, असे स्पष्ट केले. पण ते गृहमंत्रालयावर अडून बसल्याचे बोलले जातेय. मुख्यमंत्रीपद नाही मिळाले तर मलाईदार खाती मिळावीत, यासाठी शिंदेंची शिवसेना अग्रही आहे. शिवसेनेच्या या दाव्यावर भाजपने फेटाळून लावल्या आहेत. त्यातच आज राजकीय हालचालींना वेग आलाय.
एकनाथ शिंदे यांची प्रकृती अद्याप हवी तशी सुधारलेली नाही. त्यांना त्रास होत असल्यामुळे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना १०५ डिग्री ताप आला होता. ते मुंबईत परतलेत, पण अद्याप त्यांची प्रकृती सुधारलेली नाही. त्यामुळेच त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. अमित शाह यांना भेटण्यासाठी ते दिल्लीला जाणार असल्याची बातमी सकाळी धडकली होती. त्याशिवाय शिवसेना आमदारांशी चर्चा करणार असल्याचेही सांगण्यात आले होते. पण आजारी असल्यामुळे ते आज कुणालाही भेटणार नाहीत.
दुसरीकडे अजित पवार आज दिल्लीला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितलेय. अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये राजकीय हालचाली सुरु आहेतच, भाजपमध्येही राजकीय हालचालींना वेग आलाय. सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी दिग्गज नेत्यांची रीघ लागली आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षातील हालचालीनंतर महायुतीमध्ये पडद्यामागे काय घडतेय? अशी चर्चा सुरु झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.