"मकोका लावणार, एसपींची बदली होणार"
बीड सरपंच हत्या प्रकरणी फडणवीस अॅक्शन मोडमध्ये
नागपूर : खरा पंचनामा
मागील काही दिवसांपासून राज्यात बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजत आहे. यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत, या सगळ्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आपली भूमिका मांडली आहे.
तसेच या हत्येत कुणीही मास्टरमाइंड असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. तसेच खंडणी प्रकरणात वाल्मिकी कराड याच्यावर कारवाई केली जाईल, त्याच्यावर मकोका लावला जाईल, अशी माहिती फडणवीसांनी दिली. यावेळी त्यांनी सरपंच हत्याप्रकरणाचा सगळा घटनाक्रम सांगितला.
बीडमधील सरपंच हत्याकांडावर बोलताना फडणवीस म्हणाले, "मस्साजोगचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपुरतं प्रकरण नाही. याची पाळेमुळे खणावी लागतील. एव्हाडा एनर्जी यांनी बीडमध्ये पवनचक्की मध्ये गुंतवणूक केली आहे. यातून काही लोकांना रोजगार मिळत आहे. आम्ही सांगतो तोच दर द्या अन्यथा खंडणी द्या असा प्रकार इथे सुरू आहे. अशोक घुले, नारायण घुले. प्रतिक घुले असे आरोपी दुपारी तिकडे गेले. त्यांनी वॉचमनला शिवीगाळ करत मारहाण केली. सिनियर प्रोजेक्ट मॅनेजरला देखील मारहाण केली. मारहाण झाल्यामुळे पीडितांनी सरपंचांना फोन करून माहिती दिली. बाजुच्या गावातील आरोपी मारहाण करत असल्याने सरपंच घटनास्थळी आले. यावेळी सरपंचासोबत असलेल्या लोकांनी दादागिरी करणाऱ्या आरोपींना चोप दिला. या झाला.
९ डिसेंबरला संतोष देशमुख चारचाकी वाहनातून आपल्या गावी परत जात होते. तेव्हा गाडीत एकटेच होते. पेट्रोल पंपावर त्यांना आतेभाऊ भेटले. त्यांना सोबत घेऊन ते निघाले. त्यावेळी टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आणि आणखी एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर जाताच त्यांनी गाडी अडवली. काच फोडून संतोष देशमुख यांना बाहेर काढलं. स्कॉर्पिओ गाडीत टाकून मारहाण केली. तारा गुंडाळून देशमुखांना मारहाण केली. त्यांच्या डोळ्यांवर मारहाण केली, पण डोळे जाळण्यात आले नाहीत. या प्रकरणात कुणीही मास्टरमाइंड असला तरी त्याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयजी लेव्हलअंतर्गत एसआयटी स्थापन केली जाईल, अशी घोषणा फडणवीसांनी केली.
विष्णू चाटे या कटात सहभागी होता. हत्येची पाळंमुळं शोधली पाहिजेत. कंत्राटं मिळवण्यासाठी खंडणी मागितली जातेय. या प्रकरणात वाल्मिकी कराडचं नाव समोर आलं आहे. देशमुख हत्या प्रकरणात कराड विरोधात पुरावे असतील, तर त्याच्यावरही कारवाई होईल. तीन ते सहा महिन्यात चौकशी पूर्ण करणार आहे. हत्येच्या तपासात कचुरता केल्याप्रकरणी बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली, असंही फडणवीस म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.