दोनशे पोलिसांच्या स्वप्नांवर पाणी; शासनाने वाढविलेला वयोमानाचा फायदा मिळणार नाही!
मुंबई : खरा पंचनामा
कोरोनायोद्धे म्हणून गौरविण्यात आलेल्या राज्यातील २०० पोलिस अंमलदारांचे पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) होण्याचे स्वप्न भंगले आहे. कोरोना काळात परीक्षा न झाल्याचा मुद्दा लक्षात घेत सामान्य प्रशासन विभागाने वाढविलेला वयोमानाचा फायदा खात्यांतर्गत परीक्षा देणाऱ्या पोलिसांना देता येणार नाही, अशी भूमिका राज्य लोकसेवा आयोगाने घेतली. ती ग्राह्य मानून २९ डिसेंबरला होणाऱ्या मुख्य परीक्षेस बसू न देण्याचा आयोगाचा निर्णय मान्य करीत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) अंमलदारांचा अर्ज फेटाळला.
२०२३ मध्ये खात्यांतर्गत उपनिरीक्षक परीक्षेसाठी जाहिरात काढण्यात आली. या परीक्षेसाठी १ जानेवारी २०२३ रोजी अर्जदारांचे वय लक्षात घेणे अपेक्षित होते; मात्र तसे न करता ऑक्टोबर २०२३ पर्यंत वय मोजण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाने अध्यादेश काढून दोन वर्षांची वयोमर्यादा शिथिल केली. त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी ४०, तर मागास प्रवर्गासाठी ४५ वयोमयांदा निश्चित करण्यात आली; मात्र हा निर्णय सरळ सेवेसाठी असून, खात्यांतर्गत परीक्षेसाठी नाही, असे सांगत सुमारे २०० अंमलदारांना डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या पूर्व परीक्षेस बसण्यास आयोगाने नकारदिला, अशी माहिती अर्जदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
याविरोधात अंमलदारांनी मॅटचा दरवाजा ठोठावला, मॅटच्या सूचनेनुसार आयोगाने या अंमलदारांची पूर्वपरीक्षा घेतली; मात्र त्यांचा निकाल जाहीर केला नाही. त्याविरोधात त्यांनी पुन्हा मॅटकडे घाव घेतली. या सुनावणीत शिथिल वयोमानाचा फायदा देता येणार नाही. तसेच अर्जदाराला कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्याचा अधिकार असल्याची भूमिका आयोगाने घेतली. ती ग्राह्य घरीत मुख्य परीक्षेत बसू देण्याची अंमलदारांची मागणी मॅटने फेटाळली.
या निर्णयाविरोधात अंमलदारांनी उच्च न्यायालयात याचिका करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र परीक्षेला सहा दिवसच शिल्लक असल्याने याचिकेवर सुनावणी होईल का, हा प्रश्नच आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले आहे. अपात्र करण्यात आलेल्या अंमलदारांना या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणीही केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.