भाजपमध्ये प्रस्थापितांना धक्का, अन्य पक्षांमधून आलेल्यांना महत्त्वाची खाती
मुंबई : खरा पंचनामा
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खाते वाटपाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. शनिवारी, बहुप्रतिक्षित खाते वाटप झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्येष्ठ, प्रस्थापित नेत्यांना स्थान दिले असले तरी त्यांच्याकडे कमी खाती सोपवण्यात आली आहेत. तर, दुसरीकडे इतर पक्षांमधून भाजपात आलेल्यांना महत्त्वाची खाती देण्यात येणार आहे.
यंदाच्या फडणवीस सरकारमध्ये जुन्या नेत्यांचे महत्त्व कमी केलं जातंय का, याची चर्चा खाते वाटपानंतर सुरू झाली आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेले जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास खाते सोपवण्यात आले आहे. ग्रामीण भागात पक्षाची पकड बसविण्यासाठी ग्रामविकास आणि पंचायत राज हे खाते अधिक महत्त्वाचे असते. निधी वाटपाचे अधिकार ही ग्रामविकास मंत्र्यांकडे असतात. जयकुमार गोरे यांच्यावर कोरोना काळातील गैरव्यवहारांचे आरोप झाले होते. त्याशिवाय, गोरे यांच्याविरोधात चौकशीचे आदेशही कोर्टाने दिले होते.
मागील काही वर्षांपासून भाजपात असलेले आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवेंद्रराजे भोसले हे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. उदयनराजे यांच्यासोबत वाद असल्याने त्यांनी घड्याळ सोडत भाजपचे कमळ हाती घेतले असल्याचे म्हटले जात होते. मात्र, उदयनराजेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या समेट घडवण्यात भाजप नेतृत्वाला यश मिळाले. शिवेंद्रराजे भोसले यांना महत्त्वाचे खाते देत भाजपकडून शरद पवारांच्या बालेकिल्ल्यावर घाव घालण्यास सुरुवात झाली आहे. सातारा आणि पश्चिम महाराष्ट्र हा पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. तर, राष्ट्रवादीतून भाजपात आलेले संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग खात्याची जबाबदारी सोपवण्यात आले.
मूळचे शिवसैनिक आणि अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते राहिलेले गणेश नाईक यांनी काही वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. यंदा नाईक यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली असून वन खात्याची जबाबदारी दिली जाते. नाईक यांचा मुलगा संदीप नाईक यांनी बंडखोरी करत भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याविरोधात पवार गटाची तुतारी फुंकली होती. मुलाच्या बंडखोरीला नाईक यांनी पडद्याआडून मदत केल्याचा आरोप होता. अशातच नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.