"आगे आगे देखो होता हैं क्या"
मुंबई : खरा पंचनामा
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मास्टरमाइंड असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
कराडला लवकरात लवकर अटक करावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली असून जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
वाल्मिक कराड हा महायुतीच्या मंत्र्याचा निकवर्तीय आहे, त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांसह भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून देखील केला जातोय. या सगळ्या प्रकरणानंतर आता भाजपचे कॅबिनेटमंत्री आशिष शेलार यांनी वाल्मिक कराड यांच्या अटकेचे संकेत दिले आहेत. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वाल्मिक कराडवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
वाल्मिक कराडला कधी अटक होणार? असा प्रश्न विचारला असताना आशिष शेलार यांनी 'आगे आगे देखो होता है क्या' असं विधान केलं आहे. शेलारांच्या या विधानानंतर लवकरच वाल्मिक कराडला अटक केली जाईल, असं बोललं जातंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर शेलार पुढे म्हणाले, या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला उत्तर दिलं आहे. कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, कायद्याचं राज्य कायम राहील, असं शेलार म्हणाले.
बीड हत्या प्रकरणावरून विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेला उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले की, प्रत्येकाला मत मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण राज्यात अशांतता निर्माण होईल, असे कार्यक्रम आयोजित करणं अयोग्य आहे. याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. परिस्थिती निवळावी यासाठी विरोधकांनी प्रयत्न करावा, असं आवाहनही शेलार यांनी केलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.