अपघातात मृत तरुणच आरोपीच्या पिंजाऱ्यात, हायकोर्टाने पोलिसांना फटकारले
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात मृत तरुणालाच आरोपीच्या पिंजाऱ्यात उभे करणाऱ्या पोलिसांना हायकोर्टाने दणका दिल्यानंतर चूक सुधारली. आरोपपत्रातील दुचाकीस्वार तरुणाचे नाव वगळल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली.
याची दखल घेत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करणाऱ्या पोलिसांविरुद्ध तरुणाच्या आईने दाखल केलेली याचिका निकाली काढली.
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक गावाजवळ १२ सप्टेंबर २०२० रोजी रात्री दुचाकी व ट्रकमध्ये अपघात झाला होता. या अपघातात ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार सचिन घाटगे या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांनी सचिनला जबाबदार ठरवले आणि गुन्हा दाखल केला. मृत सचिनला आरोपी बनवण्याच्या पोलिसांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेत सचिनची आई आशा घाटगे यांनी अॅड. रेश्मा मुथा, अॅड. सुयोग वेसवीकर आणि अॅड. संदीप आग्रे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने पोलिसांच्या तपासावरच आक्षेप घेण्यात आला. दुचाकीस्वार सचिन ट्रकखाली चिरडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते. असे असताना पोलिसांनी फुटेजकडे दुर्लक्ष करीत सचिनला आरोपी बनवले, असा दावा केला. याची दखल घेत खंडपीठने पोलिसांच्या कार्यपध्दतीवर संताप व्यक्त करत चुकीच्या तपासावर कडक ताशेरे ओढले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.