मेफेंटमाईन इंजेक्शनची नशेसाठी विक्री, साठा करणाऱ्या तिघांना अटक, १४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची माहिती मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
वैद्यकीय वापरासाठी असलेल्या मेफेंटमाईन या इंजेक्शनची नशेसाठी विक्री आणि साठा करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल एक हजार ५०७ इंजेक्शन, नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित गोळ्या, कार, दुचाकी असा १४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहित सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केल्याचेही घुगे यांनी सांगितले. यातून आंतरजिल्हा, आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश होईल असेही ते म्हणाले.
रोहित अशेक कागवाडे (वय ४४, रा. शामरावनगर, सांगली), ओंकार रविंद्र मुळे (वय २४, रा. विजय काॅलनी, विश्रामबाग, सांगली), आशपाक बशीर पटवेगार (वय ५०, रा. पत्रकारनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वैद्यकीय इंजेक्शन, गोळ्या यांचा नशेसाठी वापर, साठा, विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना अधीक्षक घुगे यांनी मिरजेचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, महात्मा गांधी चौक पेलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. पथक त्यांचा शोध घेत असताना मिरजेतील आंबेडकर उद्यानाजवळ दोघेजण वैद्यकीय इंजेक्शन नशेसाठी विक्री करायला येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.
पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता. तेथे दोन पिशव्या घेऊन संशयास्पदरित्या फिरताना मुळे आणि कागवाडे यांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पिशव्यांची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये मेफेंटाईन इजेक्शनच्या ५१ बाटल्या सापडल्या. यावेळी पथकात असणाऱ्या औषध निरीक्षकांनी ती इंजेक्शन वैद्यकीय वापरासाठी असून त्याचा वापर नशेसाठी होत असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगलीतील पत्रकारनगर येथील पटवेगार याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली. पथकाने पटवेगार याच्या घरी छापा टाकून इंजेक्शन आणि गोळ्यांचा साठा जप्त केला. तसेच त्याने कारमध्येही ठेवलेला साठा सापडला. त्यानंतर त्याला अटक करून कार ताब्यात घेण्यात आली. तिघांकडूनही एकूण एक हजार ५०७ इंजेक्शन, गोळ्या, दुचाकी, कार असा १४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे, मिरजेचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाने महात्मा गांधी चौकचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, उदय कुलकर्णी, सर्जेराव पवार, अभिजित पाटील, सचिन कुंभार, अभिजित धनगर, नाना चंदनशिवे, विनोद चव्हाण, हणमंत कोळेकर, औषध निरीक्षक राहुल करंडे, सायबरचे उपनिरीक्षक अफरोज पठाण, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर आदींच्या पथकाने कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.