टोरेस घोटाळा प्रकरण : कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर
पोलिसांच्या भूमिकेवर न्यायालयाचे पुन्हा ताशेरे
मुंबई : खरा पंचनामा
टोरेस घोटाळ्यात सर्वसामान्यांनी आपल्या कष्टाचे पैसे गमावले आहेत, हे ध्यानी ठेवून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने आणि तप्तरतेने करायला हवा होता. परंतु, तसे न करून पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचे खडेबोल उच्च न्यायालयाने बुधवारी पोलिसांवर ओढले.
मुंबई, नवी मुंबईसह अन्य ठिकाणी दाखल गुन्हे एकत्रित करून आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) वर्ग करण्याचे आणि तपास सोयीस्कर व सुलभ होण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याबाबत विचार करण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी सरकारला दिले.
या घोटाळ्याचे गांभीर्य पोलिसांना कळायला हवे होते. घोटाळ्यात सर्वसामान्यांचे कष्टाने कमावलेले पैसे गुंतले आहेत आणि ते गमावले जाऊ नयेत म्हणून पोलिसांनी आरोपींना अटक करण्याच्या दृष्टीने तातडीने कारवाई करणे आवश्यक होते, असे ताशेरेही न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने ओढले. तसेच, भविष्यात याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी एक यंत्रणा उभारण्याची सूचनाही केली.
टोरेस घोटाळा उघडकीस आल्याचा दावा करणाऱ्या मुंबईस्थित सनदी लेखापाल अभिषेक गुप्ता याने पोलीस संरक्षणासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाने मागील सुनावणीच्यावेळी त्याला पोलीस संरक्षण उपलब्ध करण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी, घोटाळ्याच्या आतापर्यंत केलेल्या तपासाची सविस्तर माहिती सादर करण्याचेही सरकारला बजावले होते. गुप्ता याच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने पुन्हा एकदा पोलिसांच्या प्रकरणातील कार्यतत्त्परतेवर तोशेरे ओढले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.