ताब्यातील आरोपी फरार; सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित
पनवेल : खरा पंचनामा
खारघर पोलिसांनी विदेशी नागरिकाला आसरा दिल्याप्रकरणी अटक केलेला संशयित आरोपी केशव कडू पोलिसांना चकमा देत पोलिस ठाण्यातून फरार झाला. या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कौतीक जाधव यांना कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी तसेच कर्तव्यात बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार नवी मुंबई हद्दीत बेकायदा राहणाऱ्या विदेशी नागरीकाविरोधात विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवून जवळपास १६ आफ्रिकन नारिकांना खारघर, तळोजा आणि उलवे परिसरातून ताब्यात घेतले होते. त्या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत, असाच एक गुन्हा खारघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल करण्यात आला होता. त्यानुसार विदेशी नागरिकांना बेकायदा आसरा देणाऱ्या मालकावर देखील कारवाई सुरू करण्यात आली होती, या प्रकरणी खारघर पोलिसांना पाहिजे असलेला संशयित आरोपी घरमालक केशव कडू याला पोलिसांनी ताब्यात घेवून पुढील कारवाई सुरू केली होती.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे व पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ यांनी पुढील कारवाईसाठी संशयित केशव कडू याला खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. केशव कडू याला खारघर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर, संशयित आरोपी केशव कडू याच्यावर अटकेची कारवाई सुरू झाली. याचवेळी, संशयित आरोपी कडू याने पोलिसांना चकवा देत पोलिस ठाण्यातून धूम ठोकत फरार झाला. या घटनेमुळे पोलीस खात्यात खळबळ माजली होती. या प्रकरणानंतर संशयित आरोपी विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. ज्या पोलिस अधिकाऱ्याच्या ताब्यातून संशयित आरोपी फरारा झाला त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांची खातेअंतर्गत चौकशी सुरू झाली आणि अखेर या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांना दोषी ठरवत कर्तव्यात बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा केल्या प्रकरणी वरिष्ठांच्या आदेशानुसार जाधव यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.