Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पवार काका-पुतण्या एका मंचावर; जयंत पाटील-अजितदादांमध्ये गुफ्तगू

पवार काका-पुतण्या एका मंचावर; जयंत पाटील-अजितदादांमध्ये गुफ्तगू



पुणे : खरा पंचनामा 

वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ आज पुणे इथं पार पडला. या समारंभाच्या निमित्ताने दुभंगलेल्या राष्ट्रवादीचे विविध नेते पहिल्यांदाच मोठ्या संख्येने एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यासह जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, अशोक पवार आदी मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०२३ मध्ये उभी फूट पडली आणि शरद पवार व अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने या दोन्ही गटांमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. मात्र आता विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील वातावरण काहीसं निवळत असून दोन्ही बाजूचे नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने एका मंचावर आलेले पवार काका-पुतण्या आज पुन्हा एकदा पुण्यातील कार्यक्रमात एकत्र दिसले.

वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटकडून आज शरद पवार यांच्या हस्ते चांगली कामगिरी करणाऱ्या शेतकरी आणि साखर कारखान्यांना पुरस्कार देण्यात आले. तसंच संस्थेकडून पारितोषिकाच्या रक्कमेतही वाढ करण्यात आली. या कार्यक्रमात शरद पवार यांचे भाषण सुरू असताना अजित पवार आणि जयंत पाटील या दोन जुन्या सहकाऱ्यांमध्ये बऱ्याच वेळ दिलखुलास संवाद रंगल्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला अजित पवार आणि शरद पवार यांची खुर्ची शेजारी ठेवण्यात आली होती. मात्र नंतर आयोजकांनी आसन व्यवस्थेत बदल केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषक या कृषी प्रदर्शन उद्घाटन समारंभाला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मयुरेश्वर अभयारण्यातील चिंकारा हरणाची प्रतिकृती देऊन अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा सत्कार करण्यात आला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.