घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक
३ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरातील संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीचा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
आकाश सतिश कवठेकर (वय २७, रा. उमेदनगर, कुपवाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. संजयनगर येथे झालेल्या घरफोडीतील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथकाला सराईत गुन्हेगार आकाश कवठेकर कुपवाड येथील सूतगिरणी परिसरात दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
पथकाने तेथे जाऊन आकाशला ताब्यात घेतले. त्याच्याकडील सॅकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये चांदीचे दागिने, भांडी, मोबाईल, कटावणी, रोकड सापडली त्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने कुपवाड रस्त्यावरील पार्श्वनाथनगर येथे घरफोडी करून ऐवज चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दागिने, रोकड असा ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, महादेव नागणे, सागर लवटे, संदीप गुरव, अमर नरळे, मच्छिंद्र बर्डे, संदीप नलवडे, उदय माळी, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंखे, विजय पाटणकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.