फडणवीसांचा तानाजी सावंतांना 'जोर का झटका'?
तुळजापूर संदर्भातल्या अडवून ठेवलेल्या 'त्या' फाईलवर अखेर सही
धाराशिव : खरा पंचनामा
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्र हातात घेतल्यानंतर लगेचच पहिल्या 100 दिवसांच्या कामांचा आराखडा तयार केला आहे. पहिल्या शंभर दिवसांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे प्रकल्प हाती घेतले आहेत, त्यामध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासाचा देखील समावेश आहे. या मंदिराच्या विकासाचा आराखडा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच तयार करण्यात आला होता.
मात्र, अंतर्गत राजकारणामुळे तत्कालीन पालकमंत्री तानाजी सावंत यांनी ही फाइल अडवून ठेवली होती. मात्र, आता राज्याची सुत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत. शिवाय सावंत हे पालकमंत्री नसल्याने फडणवीसांनी कलेक्टर मार्फत ही फाईल मागवून त्यावर सही केली आहे. त्यामुळे फडणवीसांनी तानाजी सावंताना मोठ धक्का दिल्याचं दिसत आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1 हजार 328 कोटी रुपयांचा निधी छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला होता. तो आराखडा आता अंतिम करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार 2 हजार 100 कोटी रुपयांचा परिपूर्ण अंतिम विकास आराखडा राज्य शासनाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी आज मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.
त्यामुळे आता लवकरच या अंतिम विकास आराखड्यास मंजुरी मिळेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. जगभरातील भाविक तुळजापुरात यावे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात अर्थकारणाला बळकटी मिळावी आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी हा त्यामागील उद्देश आहे. संकल्पित आराखड्याचे आपण दिनांक 31 मार्च 2023 रोजी जनतेसमोर सादरीकरण करून त्यांच्या हरकती व सूचना मागवल्या होत्या.
आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर 16 सप्टेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत एक हजार 328 कोटींचा निधी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी आपल्या महायुती सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर 28 जुलै 2024 रोजी परिपूर्ण विकास आराखडा तयार करण्यासाठी संकल्पना स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी रीतसर निविदाही प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार सहभागी झालेल्या विविध वास्तुविशारद कंपन्यांनी अधिक परिपूर्ण असे सादरीकरण केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.