बीड पोलीस दलात उलथापालथ, चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
बीड : खरा पंचनामा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केलं जात आहे. देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कर्तव्यात कुचराई केल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता.
तसेच पोलीस दल आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही गावकऱ्यांनी केला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे तत्कालीन एसपी अविनाश बारगळ यांची बदली केली होती. त्यांच्या जागी नवनीत कावत यांची नियुक्ती केली होती.
या बदलीनंतरही सातत्याने गावकऱ्यांकडून पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक ट्वीट करत बीड पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एसआयटीमध्ये असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा मुख्य आरोपी वाल्मिक कराडशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. याबाबतचे काही फोटोही त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.
या सगळ्या घडामोडींनंतर बीड पोलीस दलात मोठी उलथापालथ करण्यात आली आहे. बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्य बदल्या केल्या आहेत. यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे. त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. ते केज पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं.
आता पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालीब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार घेणार आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही मोहीम राबवली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.