राज्यात गुइलेन सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यातील रुग्णाचा सोलापुरात मृत्यू
पुणे : खरा पंचनामा
पुण्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असतानाच आता एक वाईट बातमी समोर येते आहे. पुणे शहरात या आजाराचा पहिला बळी गेल्याचे समोर आले आहे.
पुण्यातील रुग्णाचा शनिवारी (ता. 25) सोलापूरमध्ये मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मृत रूग्ण हा धायरी परिसरात राहायला होता. त्यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रुग्ण सीए असून, एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आणि भाऊ, असा परिवार आहे. 11 जानेवारी रोजी त्यांना पुण्यातच जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही कार्यक्रमानिमित्त ते सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या गावी गेले होते.
मात्र, सोलापुरात गेल्यानंतर त्यांचा त्रास जास्तच वाढला. त्यामुळे त्यांना सोलापूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना 'जीबीएस' झाल्याचे निदान केले. उपचार सुरू असताना त्यांची तब्येत स्थिर होती. पण त्यांना हातपाय हलवता येत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. प्रकृती स्थिर असल्याने शनिवारी त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर हलवण्यात आले. मात्र, काही वेळातच त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नातेवाइकांनी दिली आहे. तर रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे समजू शकलेले नाही. त्यामुळे त्यांचे शवविच्छेदन केले जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हा आजार कोणत्यातरी वेगळ्या आजारासोबत येतो आणि आजाराला सेकंडरी आजार म्हटले जाते. 12 ते 30 वयोगटातील व्यक्तींना हा आजार होतो. हा आजार धोकादायक नाही आणि घाबरून जाण्याचे काही कारण नाही, असे पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले आहे.
गुइलेन बॅरी सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णाचे स्नायू कमकुवत होतात. स्नायू कमकुवत झाल्यामुळे रुग्णाला वेदना होतात, परंतु संवेदना कमी होतात. यामुळे चेहरा, डोळा, छाती, शरीरातील स्नायूंवर परिणाम, तात्पुरता अर्धांगवायू, श्वसनाचा त्रास होऊ शकतो. तसेच, हाताची बोटं, पायांमध्ये वेदना, चालताना समस्या, चिडचिड, चेहऱ्यावर कमजोरी ही प्रमुख लक्षणे दिसून येतात.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.