चेन स्नॅचिंग, चोरी करणाऱ्या आटपाडीतील तिघांना अटक
१०.१० लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यात चेन स्नॅचिंग, चोरी करणाऱ्या आटपाडी तालुक्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून चोरीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा १०.१० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
अक्षय महादेव माने (वय २६, रा. वलवण), साहिल कुंडलिक चव्हाण (वय २१), सचिन विठ्ठल माने (वय २३, दोघेही रा. घरनिकी, ता. आटपाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात झालेले चेन स्नॅचिंग, चोरीचे गुन्हे उघडकीस आणून संशयितांना अटक करण्याच्या सूचना निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांचे एक पथक चोरट्यांचा शोध घेत होते.
त्यावेळी पथकातील उदय साळुंखे यांना तिघेजण नंबर नसलेली दुचाकी घेऊन चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी विट्यातील बळवंत महाविद्यालय रस्ता परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केल्यानंतर अक्षय माने याच्या पॅंटच्या खिशात दागिने सापडले. त्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने भूड येथील एका वृद्धाकडील चेन जबरदस्तीने चोरून नेल्याची तसेच लेंगरे-मादळमुठी रस्त्यावर दुचाकीवरील एकाला धक्का देऊन त्याच्याकडील दागिने, तसेच करगणी (ता. आटपाडी) येथील एका घरातून दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचे दागिने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांनाही अटक करून विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, उदय साळुंखे, संजय पाटील, हणमंत लोहार, शिवाजी सिद, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, अभिजित ठाणेकर, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.