सरपंच खून प्रकरणात आरोपींना पळून जायला पैसे पुरवले, डॉक्टरची वकील बायको ताब्यात
बीड : खरा पंचनामा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात घडामोडींना वेग आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात सहभाग असलेल्या आरोपींची राज्यातील विविध भागातून उचलबांगडी करायला सुरुवात केली आहे.
पोलिसांनी नांदेडमधून डॉ. संभाजी वायबसे आणि त्यांच्या वकील पत्नीला ताब्यात घेतलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी डॉ. बायबसे यानं सुदर्शन घुले याच्याशी संपर्क साधला होता. त्यानेच आरोपींना पळून जाण्यास मदत केली, शिवाय आरोपींना पळून जाण्यासाठी पैसे पुरवल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड पोलीस, एसआयटी आणि सीआयडी अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. त्यांनी शुक्रवारी डॉ. संभाजी वायबसे आणि त्याच्या वकील पत्नीला ताब्यात घेतलं आहे. डॉक्टर वायबसे याने देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला घटनेच्या दिवशी संपर्क केल्याचा आणि त्याला पैसे पुरवले, अशी चर्चा आहे. डॉक्टर वायबसे हा ऊसतोड कामगारांचा मुकादम म्हणून काम करतो. या वायबसे दाम्पत्याला पोलिसांनी नांदेडमधून ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत एसआयटीनं त्यांची चौकशी केली आहे. यातून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.
दुसरीकडे, बीड पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी पहाटे मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी पुण्यातून या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचा साथीदार सुधीर सांगळे याला अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी पहाटे दोघांना अटक केली आहे. त्यांना बीडला आणलं जात असून लवकरच पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर केलं जाणार आहे. या अटकेच्या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.
या दोन मुख्य आरोपींसह पोलिसांनी आणखी एका संशयिताला मुंबईतून ताब्यात घेतलं आहे. या संशयिताचं नाव सिद्धार्थ सोनवणे असून देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी तो बीडमध्ये होते. यानेच मारेकऱ्यांना संतोष देशमुख यांच्या लोकेशनची टीप दिली होती, असा आरोप आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले पोलिसांच्या हाती लागल्याने या संपूर्ण प्रकरणाचा आता उलगडा होऊ शकतो. सगळा घटनाक्रम पोलिसांना समजू शकतो.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.