कोयत्याचा धाक दाखवून पोलिस जमादाराला लुटले
पैठण : खरा पंचनामा
गावभेट देऊन दुचाकीवरून पाचोडला येणाऱ्या पोलिस जमादाराला दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चौघां जणांनी कोयत्याचा धाक दाखवून ९६ हजारांचा ऐवज लुटन नेल्याची घटना मंगळवारी (ता. सात) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पाचोड - पैठण रस्त्यावर भुमरे पेट्रोल पंपाजवळ घडली. यासबंधी बुधवारी (ता. आठ) अज्ञात चोरट्यां विरुद्ध पाचोड (ता. पैठण) पोलिस ठाण्यात संबंधीत पोलिस जमादाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून जेव्हा पोलिस जमादारालाच चोरट्यांनी लुटले तेव्हा सर्वसामान्यांचं काय याची कल्पना येते. या घटनेमुळे सर्वसामान्यांत अस्वस्थेचे वातावरण निर्माण होऊन पोलिसांची जरब घटल्याचे सांगितले जात असून सर्वसामान्या च्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाचोड पोलिस ठाण्याचे जमादार रविंद्र रत्नाकर अंबेकर (वय ४० वर्षे) हे कडेठाण बिट अंमलदार म्हणुन कामकाज सांभाळतात. ते मंगळवारी (ता. सात) दुपारी चार वाजेच्या सुमारास सायकल (क्र. एमएच२० एफ डब्लू ७०६८) ने त्यांच्या बिटमधील गावांस गावभेट देण्यासाठी गेले होते. ते गावभेट करुन पाचोड ला आपल्या उपरोक्त दुचाकीने परत येत असतांना रात्री साडेआठ वाजेचे सुमारास पाचोड ते पैठण रस्त्यावरील भुमरे पेट्रोलपंपा जवळ अचानक त्यांचेपाठीमागुन दोन मोटार सायकली आल्या, ज्यावर दोन - दोन जण २५ ते ३० वयोगटातील अनोळखी इसम बसलेले होते. त्यांनी अचानक बीट अंमलदार आंबेकर यांना आवाज देवुन 'थांब रे' म्हणुन सांगितले.
आवाज ऐकून आंबेकर यांनी त्यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला थांबवली असता दोन्ही मोटार सायकलीवरील चार ईसम त्यांच्याजवळ आले व त्यांना "तुझ्याकडे काय काय आहे ते आम्हाला काढुन दे" असे म्हणाले. त्यावर पोलिस जमादार आंबेकर यांनी आपण त्यांना पोलिस असल्याचे सांगितले. त्यांनी दोन चार सेकंदाचा विचार करीत थोडे थांबुन एकाने हातात कोयता आणून त्यांस कोयत्याचा धाक दाखवुन तुझ्याकडे काय काय आहे ते लवकर काढुन द्या म्हणून दम भरला.
तेंव्हा आंबेकर यांनी त्यांच्या हातातील सोन्याची पाच ग्रॅम वजनाची अंगठी (किंमत ४३ हजार रुपये) काढुन दिली, तर चोरट्यांनी खिशातील रोख तीन हजार रुपये व आय फोन कंपनीचा प्रो-१३ मोबाईल (किंमत ५० हजार रुपये) असे एकूण ९६ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावुन पोबारा केला. आंबेकर यांनी या घटनेनंतर आरडा ओरडा केला. परंतु सभोवता लीवर कोणीही नसल्याने चोरटे त्यांच्या मोटार सायकलीवर बसुन पसार झाले.
बुधवारी (ता. आठ) सकाळी बिट अंमलदार रविंद्र आंबेकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चार चोरटयाविरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आण्णासाहेब गव्हाणे व त्यांचे सहकारी तपास करीत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.