पाण्याच्या बाॅक्समधून गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील मद्याची तस्करी करणाऱ्या साताऱ्यातील दोघांना अटक
वाहनासह ६८ लाखांचा मुद्देमाल जप्त, मिरजेच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ः अधीक्षक पोटे
सांगली : खरा पंचनामा
पिण्याच्या पाण्याच्या बाॅक्समधून गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील मद्याची आयशर टेम्पोतून तस्करी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून टेम्पोसह तीनही राज्यातील मद्य असा ६८ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या मिरज विभागाने ही कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.
टेम्पो चालक जमीर अकबर मकानदार (वय ३१), शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार (वय २७, दोघेही रा. पाडळी, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. परराज्यातील प्रतिबंधित मद्याची विक्री, तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना अधीक्षक पोटे यांनी मिरेजेचे निरीक्षक दीपक सुपे यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांचे एक पथक मिरज-सोलापूर एक्सप्रेस वेवर गस्त घालत होते. त्यावेळी एका आयशर टेम्पोमधून (एमएच १० डीटी ९२९४) तीन राज्यातील मद्याची तस्करी होत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मिरजेत एक्सप्रेस वेवर सापळा रचला होता.
खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनसुरा आयशर टेम्पो आल्यानंतर पथकाने तो अडवला. त्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्रात विक्रीसाठी परवानगी असणाऱ्या विदेशी मद्य तसेच बिअरचे ६५१ बाॅक्स सापडले. पिण्याच्या पाण्याच्या बाॅक्समध्ये हे मद्य ठेवल्याचे दिसून आले. त्यानंतर टेम्पोसह मद्य असा ६८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाने मिरजेचे निरीक्षक दीपक सुपे, जतचे निरीक्षक प्रभात सावंत, दुय्यम मिरीक्षक अजय लोंढे, लक्ष्मण पोवार, जयसिंग खुटावळे, इरफान शेख, स्वप्नील आटपाडकर, विनायक खांडेकर, कविता सुपने, शाहीन शेख, स्वप्नील कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.