Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एकाच कुटुंबातील तीन अधिकारी पुण्याचा कार्यभार सांभाळणार!

एकाच कुटुंबातील तीन अधिकारी पुण्याचा कार्यभार सांभाळणार!



पुणे : खरा पंचनामा 

राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुणे जिल्हाधिकारी पदी पदस्थापना देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पुण्याचा वेगवेगळा कार्यभार सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जितेंद्र डुडी पुणे जिल्हाधिकारी पदावर असून त्यांच्या पत्नी आंचल दलाल भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) असून पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव दलात (एसआरपीएफ) आहेत, तर शेखर सिंह डुडी यांचे मेहुणे असून ते काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त पदावर कार्यरत आहेत.

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील सचिवपदी पदोन्नती मिळाल्याने त्यांची राज्याचे जमाबंदी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी सातारा जिल्ह्याचे जितेंद्र डुडी यांना पदस्थापना देण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी गुरुवारी बदल्यांचे आदेश काढले.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार ७ फेब्रुवारी २०२४ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची क्रीडा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या जागी डॉ. सुहास दिवसे यांची बदली करण्यात आली होती. डॉ. दिवसे यांनी ११ महिन्यांच्या कालावधीत लोकसभा आणि विधानसभा या सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पाडल्या. तसेच, मतदार नाव नोंदणीतदेखील पुणे जिल्हा आघाडीवर ठेवण्याचे त्यांनी काम केले. पुण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या पूर्वेकडील टप्प्याचे ८५ ते ९० टक्के भूसंपदान आणि निवाडे प्रक्रिया वेगात पूर्ण केली.

वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात डॉ. दिवसे यांनी राज्य सरकारकडे तक्रार केल्यानंतर खेडकर यांची झालेली बदली आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण आणि कामकाजाबद्दल त्यांनी विविध सूचना मांडल्या होत्या. त्यानंतर देशपातळीवर डॉ. दिवसे चर्चेत आले होते. तसेच, लोकसभा निवडणुकीत खेड तालुक्यातील तत्कालीन प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी त्यांच्यावर राजकीय पुढाऱ्यांशी लागेबांधे असल्याचे आरोप करत त्यांची निवडणुकीपूर्वी बदली करावी म्हणून राज्य निवडणूक आयुक्तांकडे थेट तक्रार केली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.