पालकमंत्री वाटपात भाजपची धूर्त खेळी; बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातून राष्ट्रवादी हद्दपार!
मुंबई : खरा पंचनामा
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल पावणे दोन महिन्यांनंतर महायुती सरकारने पालकमंत्री जाहीर केले आहेत. यात सर्वाधिक मोठा वाटा हा अर्थातच भाजपकडे आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला नऊ, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला सात पालकमंत्रिपदे आली आहेत.
पालकमंत्रिपदाच्या माध्यमातून भाजपने मोठी खेळी केल्याचे दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या बालेकिल्ल्यातून पालकमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. पुणे वगळता शिवसेना-भाजपच्या ताब्यात चार जिल्ह्यांचे पालकत्व गेले आहे, त्यामुळे पक्षवाढीला खोका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो. अर्थात फुटीनंतर राष्ट्रवादीची ताकद विभागली गेली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित असताना पक्षाचे सर्वाधिक आमदार याच भागातून निवडून यायचे. आताही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने ११ जागा पश्चिम महाराष्ट्रात जिंकलेल्या आहेत, तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे वगळता एकाही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले नाही. एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश पालकमंत्रिपदे ही राष्ट्रवादीकडे असायची.
महायुतीच्या पालकमंत्रिपदाच्या वाटपातून राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रातून बरोबर बाहेर काढले आहे. त्याचा तोटा पक्षाला बालेकिल्ल्यात बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकमंत्र्यांच्या अधिपत्याखाली जिल्हा नियोजन समिती काम पाहत असते. या नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांना निधी दिला जातो. त्यात पालकमंत्री आपल्या कार्यकर्त्यांना झुकते माप देतात, हे उघड सत्य आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.