Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात'

'तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात'



बारामती : खरा पंचनामा 

तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात... अजित पवार नेहमीच वादग्रस्त बोलतात, परंतु मधल्या काळामध्ये ही वादग्रस्त वाक्ये कमी झाली होती. आज बोलता बोलता अजित पवारांनी पुन्हा मतदारांना असाच एक प्रश्न विचारला.

अजित पवार मेडदमधील भाषणात बोलत असतानाच काही लोक निवेदन देत होते. भाषण सुरू असतानाच अजित पवार निवेदनं वाचत अधिकाऱ्यांना बोलावून ही कामे हात वेगळी करत होते आणि अधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घाला अशी सूचना करत होते. याच दरम्यान एका कार्यकर्त्याने बरीच महिने झाले हे काम झाले नाही असा धोशा लावला. त्यानंतर दुसऱ्याही कार्यकर्त्याने त्याच्या सुरात सूर मिसळला. हे पाहून काहीसं चिडलेल्या अजित पवार यांनी चेहऱ्यावर तसा आव न आणता एक वाक्य वापरले ते म्हणजे 'तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात' असे अजित पवार म्हणाले आणि पुन्हा शांतता पसरली.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार याची चर्चा सुरू आहे. अद्यापही ना अजित पवारांनी याला दुजोरा दिला, ना शरद पवारांनी ! मात्र राष्ट्रवादीचे आमदार, खासदारांमध्ये चर्चा सुरू आहे. आज बारामतीत अजित पवारांनी पुन्हा नेहमीचाच राग आळवत लोकसभेच्या वेळी लोकांनी जे फसवले त्याची नाराजी थोडीशी जाहीर केली, पण तरी देखील त्यांनी त्यांना मतदान दिले काय आणि मला मतदान दिले काय शेवटी 'ताटात पडले काय आणि वाटीत पडले काय' असे म्हणत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या मनोमिलनाचे संकेत दिले.

अजित पवारांना यातून नेमकं काय सांगायचंय असा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यापेक्षाही अप्रत्यक्षरीत्या अजित पवार हे दुसऱ्या गटाला ही सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत का..? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. आज बारामतीतील मेडद या ठिकाणी बारामती तालुका खरेदी विक्री संघाने उभा केलेल्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार नेहमीच खासगीत बोलताना राज्यातील कोणत्याही नेत्यांच्या तुलनेत एवढेच काय अगदी शरद पवारांच्या कामाशीही तुलना करतात. आजही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या एक शब्द वापरला. पाच वर्षात अशी कामे करायची की, कुणाच्याही टर्ममध्ये एवढी कामे झाली नाहीत. अशी कामे आपण केली पाहिजेत. आपल्याला करायची आहेत असे ते म्हणाले. आज अजित पवारांनी एकाच भाषणात तीन वेळा 'ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय' असा शब्द वापरला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.