Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

13 हजार पगार अन् 16 लाखांचा जर्मनी मेड गॉगल!

13 हजार पगार अन् 16 लाखांचा जर्मनी मेड गॉगल!



छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा 

येथील क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणात एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी हर्ष क्षीरसागर याच्याकडे जगातील सर्वात महागड्या गॉगल्सपैकी एक असल्याची माहिती उघडकीस आली आहे. हा गॉगल सध्या चर्चेचा विषय ठरत असून, त्याची किंमत तब्बल १६ लाख रुपये आहे. हा गॉगल खास जर्मनीतून मागवण्यात आला होता.

जगातील सर्वात महागड्या गॉगल्सपैकी एक भारतात असून, त्याचा मालक छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुलातील २१ कोटींचा घोटाळा करणारा आरोपी हर्ष क्षीरसागर आहे. त्याने हा गॉगल जर्मनीतून १६ लाखांना मागवला होता.

हर्ष क्षीरसागरने मागवलेल्या या गॉगलची फ्रेम प्लॅटिनमची आहे. प्लॅटिनम हा एक मौल्यवान धातू आहे. या गॉगलला १८० हिरे जडवलेले आहेत. पोलिसांनी हा गॉगल जप्त केला असून, तो सध्या त्यांच्या ताब्यात आहे. हर्ष क्षीरसागर न्यायालयीन कोठडीत आहे. या गॉगलची मूळ किंमत साडेतीन लाख रुपये आहे. मात्र, त्यात आवश्यकतेनुसार बदल केल्यास त्याची किंमत वाढते. हर्षने गॉगलच्या दांड्यांना हिरे लावून घेतले होते. त्याने 'व्हीव्हीएस १' दर्जाचे हिरे लावले. तसेच, दोन्ही दांड्यांना 'पियानो वूड'चे काम करण्यात आले आहे.

हर्ष क्षीरसागर संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात कंत्राटी लिपिक पदावर होता. त्याचा पगार फक्त १३ हजार रुपये असताना त्याने २१ कोटी ५९ लाख ३८ हजार रुपयांची अफरातफर केली. त्याने वर्षभरात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपये आपल्या २ बँक खात्यांवर वळते केले आणि नंतर ते १५ पेक्षा जास्त खात्यांवर वळवून खर्च केले. या घोटाळ्यात त्याने यशोदा शेट्टी या कर्मचाऱ्याची मदत घेतली. हर्षबरोबरच त्याचे आई-वडील आणि मैत्रिणीलाही अटक करण्यात आली आहे.

हर्ष क्षीरसागरकडून पोलिसांनी १.३५ कोटींची बीएमडब्ल्यू कार, १.२० कोटी रुपयांचे वडिलांच्या नावावर असलेले ४ फ्लॅट, घरात अंतर्गत सजावटीसाठी केलेला १ कोटी रुपयांचा खर्च, बँक खात्यातील ३ कोटींची रक्कम, चीनमधून केलेली ५० लाखांची खरेदी, ४० लाखांच्या २ स्कोडा कार आणि ३२ लाखांची बीएमडब्ल्यू बाईक जप्त केली आहे. हर्षची मैत्रीण अर्पिता वाडकर हिच्याकडून छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाण्यात १.३५ कोटींचा फ्लॅट, मुंबईत १.०५ कोटींचा फ्लॅट, १.४४ लाखांचा आयफोन, १५ लाखांची स्कोडा गाडी, १.०९ लाखांचा स्मार्टफोन आणि ३ बँकांच्या खात्यात १ कोटी १ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.